चावडीवाचन हा तर शेतकऱ्यांचा अवमान : अजित पवार

सोलापूर ः येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बोलत होते.
सोलापूर ः येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बोलत होते.

सोलापूर : ‘‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना असल्याचे सांगितले. पण चावडीवाचन करून शेतकऱ्यांची आब्रू वेशीला टांगण्याचा विचार सरकार करत आहे, हा कुठला सन्मान, हा तर अवमान आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. २८) येथे सरकारवर टीका केली.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार दिलीप सोपल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कार्याध्यक्ष बळिराम साठे, संतोष पवार, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, रश्‍मी बागल, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष मनोहर डोंगरे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘सरकार शेतकऱ्यांची प्रत्येक वेळी कोंडी करत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांना बोगस म्हणाले, मी म्हणतो महसूलमंत्रीच बोगस आहेत. शेतकऱ्यांची अवहेलना करण्याचे काम सरकार करत आहे. मेट्रोपेक्षा देशातील सध्या असलेल्या रेल्वे स्थानकांचा विकास आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांकडून आणखी कागदपत्रे घ्या, पण त्यांची आब्रू, अशा पद्धतीने वेशीला टांगू नका.’’

श्री. तटकरे म्हणाले, ‘‘रिक्त जागांवरील निवडी दिवाळीपूर्वी कराव्यात. राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गटबाजी संपवून एक दिलाने कामाला लागावे. आताच्या सरकारला ट्विटरची भाषा कळते. टिवटिव करण्यापेक्षा संवेदना ठेवून जनतेचे प्रश्‍न मार्गी लावावेत.’’ श्री. सोपल म्हणाले, ‘‘दुखतंय पण बोलता येत नाही, अशी गत सर्वसामान्यांची झाली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे दुखणे मांडले पाहिजे. पूर्वीच्या सरकारचे काम आणि आताच्या सरकारचे काम यातील फरक सांगितला पाहिजे. आपले नेते फक्त शरद पवारच आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी पक्षाचे काम करावे.’’

या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा वाघ, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळिराम साठे,  रश्‍मी बागल, राजूबापू पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com