जळगावमध्ये कर्जमाफी यादीबाबतचा गोंधळ कायम

जळगावमध्ये कर्जमाफी यादीबाबतचा गोंधळ कायम
जळगाव : जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले तरी दीड लाखांवर कर्ज भरून आपले खाते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) बाहेर काढण्याबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याची माहिती आहे. तसेच कर्जमाफीच्या यादीबाबतचा गोंधळ कायम असून, ज्यांच्या नावे रकमा आल्या, त्यांना अजूनही त्यासंबंधीचा लाभ मिळालेला नसल्याच्या तक्रारीदेखील आहेत. 
 
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले त्यातील अनेक शेतकऱ्यांना सवलतीचा लाभ मिळालेला नाही. एनपीएमध्ये जे बॅंक खाते होते, त्यातील कर्जमाफीच्या लाभामुळे किती बाहेर आले, याची आकडेवारी जिल्हा बॅंकेसह अग्रणी बॅंकेकडे नाही. शेतकरी लाभ का मिळाला नाही, यासाठी बॅंकेत चकरा मारीत आहेत. कारण कर्जमाफीचा लाभ ३१ मार्चपर्यंतच मिळणार आहे. यानंतर शासन मुदतवाढ देईल की नाही, हादेखील प्रश्‍न आहे.
 
शेतकरी त्रस्त झाले असून, सचिव मंडळीदेखील सोसायटीत येऊन व्यवस्थितपणे माहिती देत नाहीत. सचिव सहायक उपनिबंधकांकडे बोट दाखवितात आणि सहायक उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी समाधानकारक माहिती देत नाहीत नंतर बॅंकेकडे जा, असे शेतकऱ्यांना सांगतात. या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, अशी स्थिती आहे. 
 
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीत आल्याचा नवा प्रकार जळगाव तालुक्‍यातील आणखी एका सोसायटीमध्ये घडला आहे. हा प्रकार शेतकऱ्यांनी थेट सहकार राज्यमंत्र्यांना सांगितला, त्यावर राज्यमंत्रीही शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत, असे एका शेतकऱ्याने सांगितले. हा घोळ शासन, प्रशासन किंवा यंत्रणा यांनाही कळत नाही. ही प्रक्रिया लांबतच असून, त्यावर एक चांगला उपाय शोधून काढावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नाना पाटील यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com