नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी ः शिंदे

नगर येथे कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण
नगर येथे कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण

नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक शेतकरी नगर जिल्ह्यातील आहेत. हा आकडा तीन लाख ७६ हजार ८०४ आहे. त्यातील एकही लाभार्थी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.१८) जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांना दाखविण्यात येणार होता; मात्र तांत्रिक कारणाने तो दाखविता आला नाही.

शिंदे म्हणाले, की या प्रमाणपत्रासोबत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेले पत्रही देण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही योजनेचा लाभ होणार आहे. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ३६ वर्षांत पहिल्यांदा मोठा पाऊस झाला आहे. यातील थेंबन्‌ थेंब अडविणे हीच शेतकऱ्यांची बॅंक आहे. गांधी म्हणाले, की यापूर्वी झालेल्या कर्जमाफीचा फायदा कारखानदार व बॅंकांना झाला. शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालाच नव्हता. या वेळी पहिल्यांदाच कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांना अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना अनेक संकटे आली असा आरोप केला जातो; पण अडचण आलेला एकही शेतकरी मला भेटला नाही. विरोधकांकडून कर्जमाफीबाबत गैरसमज पसरविले जात होते. मात्र, आम्ही आज कर्जमाफी देऊन कृतीतून उत्तर दिले आहे. त्यामुळे विरोधकांना आता बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. कार्यक्रमात दत्तात्रेय शेळके आणि धोंडिराम पालवे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्‍त केले. पालवे म्हणाले, ``२००९ पासून पाऊस व इतर साधनांअभावी पैसे उपलब्ध न झाल्याने कर्जाचे हप्ते भरू शकलो नाही. सरकारने आता कर्जमाफी केली आहे. त्यामुळे यापुढे कधीच कर्जाची थकबाकी ठेवणार नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com