दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील राजकीय वातावरण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांकडून ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर जिल्ह्यात सभा घेणार असल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. 

लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार, अशी प्रारंभी चिन्हे असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक आता चुरशीची ठरली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. याशिवाय, इतर उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली आहे. प्रथमत: देशपातळीवर चालणारा प्रचार आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आला आहे.

त्यातच राज्य पातळीवरील दिग्गज नेत्यांनी जिल्हाभर प्रचाराचे रान उठविल्याने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. कोणाला किती मते मिळणार, कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला आघाडी मिळणार, कोण जिंकणार, कोण पराजित होणार या चर्चा सुरू आहे. शिवाय, कोण जिंकणार, किती मताधिक्‍य मिळणार यावर पैजाही लागत आहेत. मंगळवारी (ता. २३) मतदान होत असून, आता खुल्या प्रचाराचे अंतिम दोन दिवस राहिले आहेत. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लावली आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस येथील गांधी मैदानावर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे कऱ्हाडच्या शिवाजी स्टेडियमवर रविवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे रविवारी कऱ्हाडमधील भाजी मंडईतील जनता व्यासपीठावर सभा घेणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शनिवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर तोफा धडाडतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com