राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदान

राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदान
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदान

मुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये आज (ता. २३) मतदान होणार असून २४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तिसऱ्या टप्प्यात २४९ उमेदवारांमध्ये १९ महिला उमेदवार असून बारामती मतदारसंघात सर्वाधिक चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. पुणे व माढा मतदारसंघांत सर्वाधिक प्रत्येकी ३१ उमेदवार असून सर्वात कमी ९ उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगावमध्ये १४, रावेरमध्ये १२, जालन्यात २०, औरंगाबादमध्ये २३, रायगडमध्ये १६, बारामतीत १८, नगरमध्ये १९, सांगलीत १२, रत्नागिरी-सिंधुदुर्गात १२, कोल्हापुरात १५ व हातकणंगले मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

या टप्प्यासाठी ५६ हजार ०२५ बॅलेट युनिट तर ३५ हजार ५६२ कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच ३७ हजार ५२४ व्हीव्हीपॅट यंत्रेसुद्धा या चौदा मतदारसंघात देण्यात आली आहेत. या टप्‍प्यातील प्रक्रियेसाठी एकूण १ लाख ४१ हजार ११३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, १७ हजार १९२ कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात एकूण १ कोटी ३३ लाख १९ हजार १० पुरुष तर १ कोटी २४ लाख ७० हजार ७६ महिला आणि ६५२ इतर नागरिक मतदान करणार आहेत. 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे १० टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com