राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई :    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

दरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तात्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदार संघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती.

तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान अशाप्रकारे : जळगाव 58.00 टक्के, रावेर 58.00 टक्के, जालना 63.00 टक्के, औरंगाबाद 61.87 टक्के, रायगड 58.06 टक्के, पुणे 53.00 टक्के, बारामती 59.50 टक्के, अहमदनगर 63.00 टक्के, माढा 63.00 टक्के, सांगली 64.00 टक्के, सातारा 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के, कोल्हापूर 69.00 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मंगळवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. 

तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, भाजपचे रावसाहेब दानवे, गिरीश बापट, संजयकाका पाटील, शिवसेनेचे अनंत गिते, चंद्रकांत खैरे, ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी आदींसह तब्बल २४९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत या टप्प्यात मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत याठिकाणी सरासरी ४६.२८ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत जळगाव येथे ४२.६२, रावेर येथे ४६.०४, जालन्यात ४९.४०, औरंगाबादमध्ये ४७.३६, रायगडमध्ये ४७.९७, पुण्यात ३६.२९, बारामतीत ४५.३५, नगरमध्ये ४५.६५ टक्के, माढा येथे ४४.१३, सांगलीत ४६.६४, साताऱ्यात ४४.७७, रत्नागिरी-सिंधुदुर्गात ४७.१८, कोल्हापुरात ५४.२४, हातकणंगलेत ५२.२७ टक्के मतदान झाले. 

दुपारी रणरणत्या उन्हातही मतदार उत्साहाने मतदानासाठी येत होते. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात, तर चुरशीने मतदान होताना दिसून आले. त्यामुळे याठिकाणी दुपारी तीनपर्यंतच मतदानाचा टक्का ५० टक्क्यांच्या पुढे गेला होता. पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र मतदारांचा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे त्याठिकाणी मतदानाचा टक्का घसरल्याचे पाहायला मिळाले.

मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असल्याने मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ झाली. संध्याकाळी पाचपर्यंत या सर्व चौदा मतदारसंघांत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. त्यामुळे आता वाढलेल्या मतांचा लाभ कुणाला होणार आणि पुण्यात मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याने त्याचा तोटा कोणाला होईल, याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. तिसऱ्या टप्प्यात एकूण २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानासाठी पात्र होते. यात १ कोटी ३३ लाख १९ हजार १० पुरुष, १ कोटी २४ लाख ७० हजार ७६ महिला आणि ६५२ इतर नागरिक मतदार होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com