साताऱ्यात उत्साहात मतदान

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

सातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान झाले. ‘आपला’ खासदार निवडण्यासाठी सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.४९ टक्के, तर पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५०.३० टक्के मतदान झाले होते. एकूण १८ लाख ३८ हजार ९८७ मतदानापैकी पाच वाजेपर्यंत ९ लाख ७४ हजार ८७५ मतदान झाले होते. 

लोकसभा निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. अनेक ठिकाणी सुवासिनींच्या हस्ते प्रथम मतदान करण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर अंगणवाडी सेविकांनी मतदान केंद्रात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली होती. मतदान केंद्रांबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. पाण्याची व्यवस्थाही केली होती. त्या दिव्यांग मतदारांना मदतही करीत होत्या. गेले काही दिवस उन्हाचा कडाका जास्तच वाढला आहे. पूर्व भागातील खटाव-माण तालुक्‍यात त्याची तीव्रता जास्त होती. यामुळे अनेक महिलांसह नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली. सकाळी नऊपर्यंत त्यामुळेच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. 

दुपारच्या सत्रात उन्हामुळे मतदार बाहेर पडले नाहीत, दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या होत्या. सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात पाच लाख ८७ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काही ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदारांचा खोळंबा झाला. यामध्ये माण तालुक्यातील मलवडीत येथील केंद्रावरील अर्धा तास तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद पडले होते.

गोवारे (ता. कराड) येथील सकाळी अकरा वाजण्याचा सुमारास मतदान केंद्र क्रमांक ९८ मधील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदार खोळंबले होते. नवीन मशिन बसविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. वाई तालुक्यातील भिरडाचीवाडी येथे मतदान केंद्र क्रमांक २८२  येथे व्हीव्हीपॅट बंद अर्ध्या तास बंद पडले होते. वाईहून तंत्रज्ञ आल्यानंतर दुरुस्ती झाली.

वाई तालुक्यातील वेळे येथे तीन वाजण्याच्या सुमारास मतदानावर बहिष्काराचे सावट असतानाच १३७ नंबर केंद्रातील मशिन सुमारे एक तासभर बंद पडले होते. महामुलकरवाडी (ता. जावली) येथे दुपारी तीन वाजता मतदान मशिन बिघडल्यामुळे  मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.  विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)  ः वाई ५१.११, कोरेगाव ५४.३१, कऱ्हाड उत्तर ५६.४९, कऱ्हाड दक्षिण ५६.२२, पाटण ५०.३०, सातारा ५०.३६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com