...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकाल

...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकाल
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकाल

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारतातील सतराव्या लोकसभा (२०१९) निवडणुकांचा निकाल आज (ता. २३) लागणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची संपूर्ण तयारी केली असून, देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी होत आहे. सात टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर भारतीय जनतेने सत्तेची माळ कोणाच्या गळ्यात टाकलीय, हे आज स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी तिसऱ्या आघाडीचाही शिरकाव हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. सतराव्या लोकसभा निवडणुकांची भारतीय निवडणूक आयोगाने १० मार्चला घोेषणा केली होती. यानंतर संपूर्ण देशभरात राजकीय पक्षांनी रणधुमाळी उठवली होती. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे अशा सात टप्प्यांत मतमोजणी पार पडली. सरासरी ६६ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. दरम्यान, महाराष्ट्रात आघाडी की युती, याविषयी उत्सुकता शिगेला पोचली आहे. संभाव्य विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या निकालांचे महत्त्व वाढले आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे उद्या (ता. 23) रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे. जनतेने आपल्या आणि देशाच्या विकासाची आस मनात ठेवून मतदान केले. जनतेचे मत "न्याय'च्या पारड्यात की "फिर से मोदी सरकार' हे आज स्पष्ट होईल.

मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तो 11 एप्रिलला 19 मेपर्यंत सात टप्प्यांत संपूर्ण देशांत ही प्रक्रिया पूर्ण झाली. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत "फिर एक बार मोदी सरकार' असा नारा दिला, तर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी "न्याय' सरकारचे आश्‍वासन दिले. चौकीदार चोर है, भ्रष्टाचारी नं. 1 पासून खाकी अंडरवेअर, औरंगजेब अशा आरोपांची राळही उडविली गेली.

कलचाचण्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल दिला आहे, जनतेचा खरा कौल आज समजेल. कलचाचण्यांवर विरोधकांनी विश्‍वास न ठेवता आणि भाजपनेही सावध भूमिका घेताना सर्व प्रकारच्या परिस्थितीची शक्‍यता लक्षात घेऊन आपापले डावपेच आखले आहेत. भाजपने जेवणावळीच्या निमित्ताने आपल्या मित्रपक्षांशी संवाद साधत खुंटी बळकट करून घेतली आहे. शिवाय, बिजू जनता दल आणि वायएसआर कॉंग्रेस यांसारखे तगडे प्रादेशिक पक्षही भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाल्या दिवसापासून धुसफूस सुरू आहे. त्यांच्यातील भांडणे विकोपाला गेली तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात. दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांपासून आणि विशेषत: मागील चार दिवसांत कलचाचण्यांचे अंदाज बाहेर आल्यानंतर तेलुगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक यांच्या आपापसांतील चर्चेला प्रचंड वेग आला होता. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने भाजपेतर आणि कॉंग्रेसतर आघाडीसाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. अर्थात, सत्तेचा लंबक कोणत्या बाजूला झुकेल, त्यावर या प्रयत्नांची दिशा अवलंबून असेल.

या सर्व पक्षांपासून कॉंग्रेस पक्ष दोन हात दूर असला तरी भाजपेतर सरकार स्थापन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेवर येऊच द्यायचे नाही, अशी कॉंग्रेसचीही प्रबळ इच्छा आहे. त्यामुळेच प्रसंगी आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, इतर कोणत्याही प्रबळ प्रादेशिक पक्षाला पंतप्रधानपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. त्यामुळे निकालानंतरही सामन्यात चुरस कायम राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यंदाची निवडणूक ही नेहमीपेक्षा वेगळी ठरली ती आरोप-प्रत्याचारोपांमुळे. प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला पडून एकमेकांच्या खासगी आयुष्यावर बोलले गेले. कॉंग्रेसने 60 वर्षांत काहीच केले नाही आणि गेल्या पाच वर्षांत भाजपमुळे देशाची मान जगात कशी उंचावली गेली, सांगताना पुलवामासारख्या घटनांचे दाखले देण्यात आले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीवरही शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला. राफेल, नोटाबंदी, शेतकऱ्यांची पीककर्ज माफी यांमधील सरकारच्या उणिवा उघडकीस आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला.

दृष्टीक्षेपात निवडणुक.. लोकसभेच्या एकूण जागा : 543 निवडणूक झाली : 542 देशातील सरासरी मतदान : 67 एकूण उमेदवार : 8049 मतदानाचे एकूण टप्पे : ७ एकूण मतदार : ९० कोटी नवमतदार : दीड कोटी एकूण मतदार केंद्र : १० लाख ३५ हजार ९१८ व्हीव्हीपॅट मशिन : १७. ४ लाख -------------- या निवडणुकीतील आत्ता (ता.२१) पर्यंतची जप्ती रोख रक्कम : ८४१.२२ कोटी मद्य : २९८.९६ कोटी अमली पदार्थ : १२७१.८८ कोटी मौल्यवान धातू : ९८६.९३ कोटी इतर जप्त वस्तू : ५९.५९ कोटी ------------------------ झालेले मतदान (टक्के) टप्पा १ : ६९.५० टप्पा २ : ६९.४४ टप्पा ३ : ६८.४० टप्पा ४ : ६५.५० टप्पा ५ : ६४.१६ टप्पा ६ : ६४* टप्पा ७ : ६४.२६* *टक्केवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध ------------------------ २०१४ निवडणूक निकाल : एकूण जागा : ५४५ भाजप : २८२ एनडीए : ३३६ कॉंग्रेस : ४४ यूपीए : ६०  ------------------------ महाराष्ट्रातील उत्कंठावर्धक लढती नागपूर : नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध नाना पटोले (कॉंग्रेस) नांदेड : अशोक चव्हाण (कॉंग्रेस) विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी (भाजप) विरुद्ध ऊर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस) दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस) मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिवसेना) बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध कांचन कुल (भाजप) माढा ः संजय शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) कोल्हापूर : संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध धनंजय महाडिक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) नगर : सुजय विखे-पाटील (भाजप) विरुद्ध संग्रम जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस) रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत (शिवसेना) विरुद्ध नीलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com