लोकसभा, विधानसभेच्या ३ जागांसाठी पोट निवडणुका

लोकसभा, विधानसभेच्या ३ जागांसाठी पोट निवडणुका
लोकसभा, विधानसभेच्या ३ जागांसाठी पोट निवडणुका

मुंबई : लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर, भंडारा-गोंदिया मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर तिसऱ्या दिवशी ३१ मे रोजी निकाल जाहीर केले जातील.  लोकसभेत भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे नाना पटोले यांनी डिसेंबर २०१७ मध्ये भाजपचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याने भंडारा-गोंदियाची जागा रिक्त झाली होती. भाजपचे खासदार चिंतामण वनगा आणि काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांच्या निधनामुळे अनुक्रमे पालघर तसेच पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. भारत निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने राज्यातील पोटनिवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. केंद्रातील भाजप सरकार पुढील महिन्यात पाचव्या वर्षात पदार्पण करेल, तर राज्यातील फडणवीस सरकारला साडेतीन वर्षांचा कालावधी झाला आहे. यादरम्यान राज्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका आणि निवडणुकीचे निकाल राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकतात. दरम्यान, पालघर, भंडारा-गोंदिया आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट  यंत्र लावले जाणार आहेत. मतदान यंत्राबाबत संशयाचे वातावरण असल्याने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदाराला त्याने केलेल्या मतदानाची खात्री पटणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ पैकी औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, वर्धा, अमरावती, अचलपूर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर आणि भंडारा अशा १३ मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा वापर झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com