उजनीच्या पाण्याने गाठली नीचांकी

उजनीच्या पाण्याने गाठली नीचांकी
उजनीच्या पाण्याने गाठली नीचांकी

इंदापूर, जि. पुणे ः पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांना वरदान ठरलेल्या उजनी धरण जलाशयातील पाण्याने नीचांकी पाणीपातळी गाठल्याने जलसंकट घोंगावू लागले आहे. येत्या जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत धरणातील पाणी पुरवावे लागणार असल्याने धरणातील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. धरणातील पाणी पेटू लागल्याने राजकीय नेते तसेच उजनी धरण व्यवस्थापनास जनक्षोभास सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, (ता. १३ एप्रिल रोजी) उजनी धरणाची एकूण पाणीपातळी ४८८.४९५ मीटर असून, धरणात उणे २९.३५ टक्के पाणीसाठा आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे १५.७२ टीएमसी असून, हे पाणी मे व जून महिन्यापर्यंत पुरवायचे आहे. गेल्या वर्षी उजनी धरणाची आजच्या दिवशीची पाणीपातळी ४९३.०५० मीटर होती, तर धरणात अधिक २८.७९ टक्के पाणीसाठा होता. 

सोलापूर शहरासाठी पिण्याचे पाणी (ता. २० फेब्रुवारीपासून) कालव्यातून ३२०० क्‍युसेक, तर २३ मार्चपासून भीमा नदीत ७ हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात आल्याने अडचणीच्या प्रसंगी धरणातील १५ टीएमसी पाणी संपले आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्र, कालवा व बोगद्याकाठच्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार असून, उभी पिके पाण्याअभावी जळून जाणार आहेत. ज्या वेळी धरणातील पाणीपातळी ४८७.३०० मीटर होईल त्या वेळी धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडणार आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे पारदर्शी नियोजन होणे गरजेचे आहे. 

उजनीच्या पोटात ५१ हजार कोटी रुपयांचे काळे सोने काढून घेण्यासाठी सरकारने पाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे उजनीकाठचे शेतकरी धास्तावले आहेत. येत्या पावसाळ्यात पुणे जिल्हा लाभक्षेत्रातील धरणातून येणाऱ्या पाण्यातून तालुक्‍यातील मदनवाडी ते तरंगवाडी, वडापुरी, गलांडवाडीपर्यंतचे सर्व तलाव प्रथम भरून घ्यावेत व त्यानंतर उजनी धरणात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com