मध्य प्रदेशलाही गारपिटीचा तडाखा

मध्य प्रदेश गारपीट
मध्य प्रदेश गारपीट

नवी दिल्ली ः मध्य प्रदेशात रविवारी (ता. ११) अनेक भागांत गारपीट झाली. सर्वांत जास्त फटका भोपाळ जिल्ह्याला बसला असून बेतुल, शिवपुरी, शेऊपूर आणि उमारिया जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपीट झाली. या गारपिटीत शेतातील गहू, हरभरा, वाटाणा, मसूर आदी रब्बी पाकांचे नुकासान झाले. तसेच चार जणांचा मृत्यू झाला आहे. काही जनावरेही दगावल्याचे समजते.  रविवारी राज्यात सर्वत्र स्वच्छ आकाश होते. पाऊस येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र अचानक वातावरण बदलले आणि वादळ, पाऊस व गारपीला सुरवात झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गारपीट झाली, परंतु सर्वांत जास्त फटका हा भोपाळ जिल्ह्याला बसला. पाऊस आणि गारपिटीनंतर या भागातील तापमान खूपच कमी झाले होते. तसेच गारपीट आणि विजांमुळे ग्वालिअर आणि भिंड जिल्ह्यांत चार जणांचा मृत्यू झाला, तर राज्यभरात १२ जण जखमी झाले आहेत. राज्यातील अनेक भागांत पाऊसही झाला आहे.  बेतूल जिल्ह्यातील चिचोली, निवारी, रोझाडा, मालीपुरा आणि नसिराबाद या गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. यात गहू, हरभरा, वाटाणा, मसूर आदी रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच आंबा आणि महुआ बागांनाही फटका बसला आहे. शिवपुरी जिल्ह्यात विजांच्या कडकाडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील किमान तापमानात खूपच घट झाली होती. या पावसात काढणीला आलेल्या पिकांचे नुकासान झाले. जिल्ह्यात नुकतेच हरभरा आणि मसूरच्या काढणीला सुरवात झाली होती.   शेऊपूर जिल्ह्यात काढणीला आलेल्या हरभरा पिकाचा घास हिरावला गेला आहे. शेतकरी शेतात हरभरा काढणीचे काम करत असताना अचानक पाऊस आणि गारपिटीला सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ होऊन त्यांना पीक वाचविण्याची संधी मिळाली नाही. उमारिया जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. जिल्ह्यात या पावसामुळे हरभरा आणि वाटाणा पिकाचे नुकसान झाले आहे. विदिशा जिल्ह्यातही गारपिटीने हरभरा, मसूर, तेवडा पिकांचे नुकसान झाले आहे.  पिकांचे नुकसान  मध्य प्रदेशातील भोपाळ, बेतुल, शिवपुरी, शेऊपूर आणि उमारिया जिल्ह्यांमध्ये रविवारी जोरदार पाऊस आणि बऱ्याच भागात गारपीट झाली. पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा, मसूर, सोयाबीन, तेवडा आणि वाटाणा पिकांचे नुकसान झाले. सध्या राज्यात हरभरा आणि वाटाणा काढणीचे काम सुरू आहे. बऱ्याच भागांत शेतकरी शेतात काढणीच्या कामात व्यस्त असताना दुपारी चारच्या सुमारास अचानक वातावरण बदलून पाऊस व गारपिटीला सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्याची संधीच मिळाली नाही. राज्यात या गारपिटीत पिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.  मध्य प्रदेशातील स्थिती

  • गहू, हरभरा, मसूर, सोयाबीन, तेवडा आणि वाटाणा पिकांचे नुकसान
  • गारपीट आणि विजांमुळे चार जणांचा मृत्यू, जनावरेही दगावली
  • पाऊस आणि गारपिटीमुळे किमान तापमानात घट
  • राज्यातील अनेक भागांत पुढील २४ तासांत पावसाची शक्यता 
  • शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे भरपाईची मागणी
  • पिकांचे पंचनामे करून मदत देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
  • हिमाचलमध्ये हिमवृष्टी सोमवारी (ता.१२) हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी झाली. येथील डोंगर व दऱ्यांमध्ये हिमवृष्टीने पांढरी चादर पसरली होती. राज्यातील बहुतेक भागांतील रस्ते सोमवारी बर्फाने माखले होते. सिमला शहर आणि परिसरातील रस्ते बंद झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. तसेच भारत-तिबेट रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक झाले होते त्यामुळे वाहतूक बसंतपूर आणि किंगल मार्गे वळविण्यात आली होती. कोठी येथे १५ मिमी. केलाँग ११ मिमी., भरामौर १० मिमी., नारकंडा १० मिमी., ठेंग येथे ३ मिमी. हिमवृष्टी झाली होती. आजही गारपिटीची शक्यता ः आयएमडी देशातील दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांत मंगळवार (ता. १३) पर्यंत वादळी वाऱ्यांसह गारपिटीची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले आहे. रविवारी बऱ्याच भागात पाऊस झाल्याने किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. हे किमान तापमान नैर्ऋत्य, मध्य आणि पश्चिम भारतात पुढील तीन दिवस कायम राहील. तसेच तेलंगणा राज्यातील काही भागांत मंगळवारी विजांच्या कडकडासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे, असेही आयएमडीने म्हटले आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com