‘माफसू’ची हायटेक डेअरी अडकली लाल फितीत

‘माफसू’ची हायटेक डेअरी अडकली लाल फितीत
‘माफसू’ची हायटेक डेअरी अडकली लाल फितीत

नागपूर : राज्यात दुग्ध उत्पादनवाढीसाठी पूरक तंत्रज्ञान देण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील (माफसू) हायटेक डेअरी प्रकल्प लाल फितीत अडकला आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पाची अंमलबजावणी रखडली आहे. 3 डिसेंबर 2000 पासून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्वतंत्ररीत्या अस्तित्वात आले. आजवर 17 वर्षांचा कालावधी उलटूनही दुग्धोत्पादन क्षेत्रासाठी विद्यापीठाद्वारे एकही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध केले नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

कधीकाळी दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र नजीकच्या काळात दुधाच्या स्वयंपूर्णतेबाबत पिछाडला आहे. विदर्भात तर या संदर्भात परिस्थिती अतिशय खराब आहे. नजीकच्या काळात एनडीडीबी (नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्ड)च्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यात दुग्धोत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे; परंतु या प्रयत्नांमध्ये माफसूचा वाटा मात्र नसल्यासारखाच आहे.

माफसूचे कामकाज यापूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत चालत होते. नवीन स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीनंतरही विदर्भ आणि मराठवाड्याच्या वातावरणात तग धरणाऱ्या नव्या दुधाळ जाती संशोधनाचे कार्य माफसूकडून हाती घेण्यात आले नाही. यामुळे नवीन संशोधनाअभावी अशी विद्यापीठे पांढरा हत्ती ठरत असल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे.

कामाला सुरवातच नाही माफसूकडे तंत्रज्ञान नसल्याने विद्यापीठाला भेट देणाऱ्या शेतकरी, पशुपालकांना काय दाखविणार, असा प्रश्‍न होता. त्यावर तोडगा म्हणून मॉडेल डेअरी फार्म विकसित करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांनी याकरिता सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद केली. कॅटल ब्रीडिंग फार्मजवळची जागा निश्‍चित झाली. त्या ठिकाणी विविध जातींच्या चाऱ्याची पहिल्या टप्प्यात लागवड झाली. परंतु त्यानंतर आजवर या कामाला हातच लागला नाही. विद्यापीठातील तज्ज्ञांकडून हा प्रकल्प तडीस जात नसल्याचे पाहून त्याच वेळी एनडीडीबीच्या तज्ज्ञांची मदत घेण्याचेही ठरले. परंतु त्यानंतरही प्रकल्पाचे कार्यान्वयन झाले नाही.

प्रशासनात यासंबंधी प्रकल्पाच्या अंमलबजावणीविषयक चर्चा सुरू आहेत. मॉडेल डेअरी फार्मचा आराखडा अंतिम झाल्यानंतर तो राबविला जाईल. एनडीडीबीच्या तज्ज्ञांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. मिश्रा यांच्या सांगण्यावरून पाहणी केली होती. त्यांच्याकडून आजवर कोणताच अहवाल मिळाला नाही. मॉडेल डेअरी फार्म खऱ्या अर्थाने मॉडेल हवे यावर भर दिला जात असल्याने अंमलबजावणीस वेळ लागत आहे. - दिलीपसिंग रघुवंशी , उपसंचालक व डेअरी प्रकल्प व्यवस्थापक, माफसू, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com