जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।

माघी वारी यात्रा
माघी वारी यात्रा

जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदी हरी ।। पंढरपूर, जि. सोलापूर : अशी भावना मनात साठवत सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत लाखो वारकरी दाखल होत आहेत. उद्या शनिवारी (ता. १६) माघी एकादशीनिमित्त वारीचा मुख्य सोहळा होत आहे. माघी एकादशीनिमित्ताने दशमीला चंद्रभागेतील स्नानाला महत्त्व असल्याने शुक्रवारी (ता. १५) सकाळपासूनच पंढरीत वारकऱ्यांची रिघ लागली. दुपारपर्यंत जवळपास साडेतीन लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले होते.  टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी गर्जून गेली आहे. शहरातील विविध संतांची मंदिरे, मठ, धर्मशाळा या ठिकाणी कीर्तन, प्रवचनाचे सूर आळवले जात आहेत. दिवसभर एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनातून वारकरी येथे येत असल्याचे दिसत होते. यात्रेनिमित्त नदीच्या पैलतिरावरील ६५ एकर जागेमध्ये प्रशासनाने निवासासाठी उत्तम व्यवस्था केलेली असल्याने वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या परिसरात राज्यभरातून आलेले लाखो वारकरी तंबू आणि राहुट्यांमधून मुक्कामास आहेत. राहुट्यांमधून होत असलेल्या भजन-कीर्तनामुळे तेथील वातावरणही भक्‍तिमय झाले आहे.  चंद्रभागा नदीत यंदा स्नानासाठी मुबलक पाणी असल्याने वारकऱ्यांनी शुक्रवारी दशमीच्या स्नानाची पर्वणी साधली. त्यासाठी पहाटेपासूनच नदीच्या दोन्ही तिरावर गर्दी झाली होती. नदीत स्नान केल्यानंतर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेकडे जात होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज चार क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंत गेली होती. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये याकरिता मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना येथील रेस्क्‍यू टीमचे सुमारे शंभर स्वयंसेवक मदत करीत आहेत. दरम्यान, विठुरायाच्या दर्शनरांगेतही लाखभर वारकरी उभे आहेत. प्रतिमिनिटाला ३० ते ५० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत. किमान १४ ते १५ तास दर्शनरांगेतील दर्शनासाठी लागत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com