विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

पंढरपूर ः येथे रविवारी माघी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात झालेली भाविकांची गर्दी  (छायाचित्र ः राजकुमार घाडगे, पंढरपूर)
पंढरपूर ः येथे रविवारी माघी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात झालेली भाविकांची गर्दी (छायाचित्र ः राजकुमार घाडगे, पंढरपूर)

माघी यात्रेनिमित्त तीन लाखांहून अधिक भाविक  दर्शनासाठी लागला १६ तासांपेक्षा जास्त कालावधी पंढरपूर, जि. सोलापूर  विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥  हरि कीर्तनाची दाटी । तेथे चोखा घाली मिठी ॥ श्री विठ्ठलाच्या दर्शनाचे समाधान आणि माघी यात्रा सोहळ्याचा आनंद मिळवण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे आले आहेत. यात्राकाळात २६ जानेवारी, शनिवार आणि रविवार जोडून आल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज (रविवारी) माघी एकादशी दिवशी सोळा तास लागत होते. दरवर्षीपेक्षा यंदा अधिक गर्दी झाल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग शनिवारी रात्री पाचव्या क्रमांकाच्या पत्राशेडमध्ये गेली होती. यंदा माघी यात्रेला जास्त गर्दी झाल्याबद्दल अशोक पांडुरंग कदम (कणकेवाडी, ता. राधानगरी, जिल्हा-कोल्हापूर) यांना विचारले असता, ते म्हणाले, आमच्या भागातील ऊसतोड यंदा लवकर संपली आहे. शेतशिवारामध्ये सध्या काही महत्त्वाची कामे नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा आमच्या दिंडीत या वर्षी दुप्पट वारकरी सामील झाले आहेत.  माघी एकादशीनिमित्त चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. स्नान आटोपल्यानंतर भाविक दर्शनरांगेत तर दिंड्या नगर प्रदक्षिणेला जात होत्या. सकाळी १० वाजता श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेल्या बाबूराव सदाशिव जाधव (रा. अमदाबाद, तालुका - भालकी, जिल्हा - बिदर) यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही काल सायंकाळी ६ वाजता दर्शन बारीमध्ये उभे होतो. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने चहा-पाणी देण्यात आले. मात्र रांग पुढे सरकण्याचा वेग कमी असल्यामुळे दर्शनासाठी जवळपास १६ तास लागले.

अतिक्रमणे जैसे थे..... दरवर्षी यात्रेत स्थानिक नागरिकांच्या दुकानांच्या पुढील रस्त्यावर हे विक्रेते त्यांचे स्टॉल मांडून बसतात. या वर्षीदेखील तीच परिस्थिती दिसत आहे. सर्वत्र परगावाच्या विक्रेत्यांनी स्टॉल लावल्याने वारकऱ्यांना चालणे मुश्‍किल होत होते.

स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष  मंदिर परिसरात व स्टेशन रोडवर अनेक ठिकाणी कचरा साठल्याचे दिसत होते. याबाबत पुणे येथून सहकुटुंब आलेले अमित सिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असूनही येथे सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. किमान मंदिर परिसर तरी कचरामुक्त ठेवायला हवा.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com