महाबळेश्वर ठरले यंदा सर्वाधिक पावसाचे ठिकाण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने नुकतेच जाहीर केले आहे. राज्यात चार महिन्यांच्या मुक्कामात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मोसमी पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये ५५२७.८ मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे महाबळेश्वर पावसाळ्यात राज्यात सर्वाधीक पाऊस पडलेले ठिकाण ठरले आहे.

यंदा माॅन्सूनने राज्याच्या दक्षिण भागात म्हणजे तळकोकणात साधारणपणे ८ ते ९ जूनच्या दरम्यान दाखल झाला. त्यानंतर हळूहळू वाटचाल करत १०-११ जूनपर्यंत महाबळेश्वर या भागात दाखल झाला. तर १२ ते २३ या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पुढे खान्देश व विदर्भापर्यंत मजल मारून नंतर पुढे सरकून उत्तरेकडे कूच केली.

परंतु, या कालावधीत कोकण व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये चांगला पाऊस झाला. येथे जून ते आॅक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी ५५३० मिलिमीटर असून यंदा ५५२७.८ मिलिमीटर म्हणजेच जवळपास १०० टक्के पाऊस पडला आहे.

पावसाळ्यातील चार महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक पाऊस २० सप्टेंबर रोजी पडला. या दिवसाची सरासरी ११.४ मिलिमीटर असून २४८.४ मिलिमीटर एवढा पाऊस या ठिकाणी पडला असल्याची नोंदही हवामान विभागाकडे झाली आहे.

महाबळेश्वरच्या गेल्या १९४१ ते २०१६ या ६७ वर्षांतील पावसाचा विचार केल्यास १९४४ मध्ये १३७ टक्के पाऊस पडला होता. तर १९६८ मध्ये सर्वात कमी म्हणजे अवघा ४७ टक्के पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे.

त्यानंतर दरवर्षी शंभर टक्याच्या जवळपास या ठिकाणी पाऊस पडतो. गेल्या वर्षी येथे चांगला पाऊस झाला होता. यंदा सप्टेंबरनंतर १९ जुलै रोजी १८१.८ मिलिमीटर, ३० जून रोजी १८०.१ तर २९ आॅगस्ट रोजी १६५. ८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे दर महिन्याच्या पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात चांगली वाढ झाल्याचे दिसून येते.

हवामान विभागाचे वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव म्हणाले, की सह्याद्रीच्या पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे साडे चार हजार फूट उंचीवर हे ठिकाण आहे. येथे मुख्यत अरबी समुद्रावरून पाऊस देणारे वारे वाहतात. अरबी समुद्रावरून येणारे वारे आधी कोकणात पोचतात. त्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा लागतात. या पर्वतरांगांच्या माथ्यावर महाबळेश्वर आहे.

परंतु माॅन्सूनच्या आगमनाच्या वेळी अरबी समुद्रावरून वारे येतात तेव्हा त्यात बाप्ष अधिक असते. सह्याद्रीच्या बाजूला येणारे वारे हे कमी उंचीवरून जास्त उंचीवर जात असतात, त्या वेळी त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. परिणामी वाऱ्यासोबत असलेले बाष्प पावसाच्या रूपात जमिनीवर येते. त्यामुळेच सह्याद्रीच्या खोऱ्यात मोठा पाऊस पडतो.

महाबळेश्वर हे उंच ठिकाण आहे. त्यामुळे येथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. यंदाही येथे शंभर टक्के पाऊस पडला आहे. तर वीस सप्टेंबर रोजी सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. - ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे.

यंदा पावसाळ्यात महिनानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) महिना             सरासरी पाऊस           झालेला पाऊस जून                ८९७.८                      १२३३.२ जुलै               २२८४                        २३९३.६ आॅगस्ट          १७७६.३                      १२२९.१ सप्टेंबर          ५७१.८                        ६७१.९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com