कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागे

आपल्याकडील स्थितीत तग धरण्याचे, अधिक उत्पादन देणारे वाण यावर संशोधन व्हायला हवे. भारत कापसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण मानला जातो. १९५० नंतर मोठी प्रगती कापूस उद्योगात झाली. परंतु पिमा, गिझा हे ३५ ते ३७ मिलिमीटर लांबीच्या कापसाचे उत्पादन भारतात अपवाद वगळता कुठेही होत नाही. मग आयात करावी लागते. आयात दरवर्षी किमान १८ ते २० लाख गाठींपर्यंत होऊ लागली आहे. महाराष्ट्रात कापूस लागवड अधिक होते, पण उत्पादन गुजरातच्या तुलनेत कमी आहे. याचाही विचार व्हावा. - दीपकभाई पाटील, सदस्य, अखिल भारतीय वस्त्रोद्योग महासंघ
कापूस
कापूस

जळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार वर्षांपासून देशातील इतर लहान राज्यांच्या तुलनेत मागे राहिले आहे. मागील तीन वर्षांपासूनचे प्रतिकूल वातावरण आणि गुलाबी बोंड अळीचे संकट यांमुळे उत्पादकतेसह उत्पादनही गुजरातच्या तुलनेत कमी आहे. देशात सर्वाधिक कापूस लागवड राज्यात केली जाते, पण घटते उत्पादन हा चिंतेचा विषय बनला असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान अडचणीत सापडले आहे.  

गुजरातेत जवळपास २५ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. परंतु गुजरातमधील जवळपास ६५ ते ७० टक्के कापसाखालील क्षेत्र हे पूर्वहंगामी असल्याने गुजरात यंदाही उत्पादनात आघाडीवर राहील. गुजरातेत सुमारे ९० ते ९३ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन येऊ शकते. तर राज्यात ७५ ते ८० लाख गाठींचे उत्पादन येण्याची शक्‍यता आहे. सध्याचा हंगाम अर्धाही संपलेला नाही, परंतु राज्यात कापसाचे पीक मरणासन्न अवस्थेत आहे. 

विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील आवर्षणप्रवण स्थिती आणि गुलाबी बोंड अळीचा नोव्हेंबरच्या मध्यात वाढलेला प्रादुर्भाव यामुळे फरदड (कापसाचा दुसरा हंगाम) घेणे शक्‍य नाही. राज्यात फरदडचे पीक काढून क्षेत्र झपाट्याने रिकामे होत आहे. पूर्वहंगामी कापसात शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ क्विंटलचे उत्पादन खानदेशातील तापीकाठ व इतर नद्यांच्या काठावरील गावांमध्ये आले आहे. गुजरातमध्ये मात्र पहिल्या वेचणीला कापसाचे बऱ्यापैकी उत्पादन आले असून, एकरी जवळपास १० ते ११ क्विंटलपर्यंतचे उत्पादन गुजरातच्या कापूसपट्ट्यातील जुनागड, राजकोट व इतर भागात आले आहे. या भागातील कापसाचा दर्जाची चांगला आहे. परंतु, महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमधील कोरडवाहू कापसालाही आवर्षणप्रवण स्थितीचा फटका बसला आहे. यामुळे यंदा मागील हंगामाच्या तुलनेत गुजरातचे कापूस गाठींचे उत्पादन जवळपास १० ते १३ लाख गाठींनी कमी होऊ शकते. तर राज्यातही कापूस गाठींचे उत्पादन ८५ लाख वरून ७५ ते ८० लाख गाठींवर येऊ शकते. 

राज्यात प्रमुख पिकांमध्ये कापसाचा समावेश आहे. पण हवे तसे उत्पादन येत नसल्याने प्रक्रिया उद्योगासमोर नेहमी कापूसटंचाईचे संकट असते. जिनिंग प्रेसिंग कारखानदारांना कापूसटंचाईचा सामना हंगामाच्या सुरवातीपासून म्हणजेच ऑक्‍टोबरमध्ये जाणवायला लागतो. हे टंचाईचे संकट अगदी अखेरपर्यंत कायम असते. देशात कापूस उत्पादकतेत कर्नाटक, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडू ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्यात कापूस वाण व इतर बाबींच्या संशोधनासाठी एवढी मोठी यंत्रणा आहे. केंद्र अनेक आहेत, परंतु राज्याच्या बदलत्या वातावरणात, हवामानात, पर्जन्यमानात तग धरणारा, चांगले उत्पादन देणारा वाण नसल्याने मोठी अडचण येत असल्याचे कापूस उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे.  मागच्या हंगामातही कमी उत्पादकता मागच्या कापूस हंगामात म्हणजेच २०१७-१८ मध्ये राज्यात ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. तर उत्पादकता ३३४ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली. गुजरातमध्ये लागवड २६ लाख हेक्‍टरवर झाली होती. गुजरातची उत्पादकता ६८१ किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत राहिली. राज्यात या हंगामात (२०१८-१९) सुमारे ४० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. राज्यात कापसाखालील सुमारे २१ टक्के क्षेत्र पूर्वहंगामी (बागायती) आहे. तर देशात गुजरात हे क्रमांक दोनचे कापूस लागवड करणारे राज्य आहे.

उत्पादकता व क्षेत्र दृष्टीक्षेपात (क्षेत्र लाख हेक्‍टरमध्ये, उत्पादकता किलो रुई, प्रतिहेक्‍टरी)

वर्ष  २०१५-१६     २०१६-१७  
राज्ये   क्षेत्र उत्पादकता   क्षेत्र     उत्पादकता
पंजाब ३.३९ ३७६   २.५६ ५९८
हरियाणा   ५.०३   ४२३    ४.९८ ६८३
राजस्थान  ४.४८ ५६९    ४.४२ ६९२
गुजरात   २७.१९ ५८८      २४.०० ६७३
मध्य प्रदेश ५.४७ ५५९ ५.९९  ५९६
तेलंगणा   १७.७८    ५६९   १२.५०     ६५३
आंध्र प्रदेश   ६.६६ ६१३ ४.४९ ७१९
कर्नाटक    ६.३३ ५३७ ४.६४ ७६९
तमिळनाडू   १.४२ ५९९ १.५० ६८०
ओरिसा १.२५  ४०८ १.३६ ३७५
महाराष्ट्र ३८.२७ ३३३ ३८.०६ ३९८

   (माहिती स्राेत ः भारतीय कापूस महामंडळ) देशाची कापूस उत्पादकता (क्षेत्र लाख हेक्‍टरमध्ये, उत्पादकता किलो रुई प्रतिहेक्‍टरी)

वर्ष    लागवड     उत्पादकता
२०१५-१६  ११८  ४८४
२०१६-१७     १०५    ५६८
२०१७-१८   १२२  ५३१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com