राज्यात ९४७ लाख टन उसाचे गाळप

राज्यात ९४७ लाख टन उसाचे गाळप
राज्यात ९४७ लाख टन उसाचे गाळप

पंढरपूर, जि. सोलापूर : साखर तज्ज्ञांचे सर्वच अंदाज चुकवत यावर्षी राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत विक्रमी ९४७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा जवळपास दोनशे लाख टन अधिक गाळप होईल, असा अंदाज आहे. आतापर्यंत १६९ कारखाने बंद झाले असून, आणखी १८ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. ३० मेअखेर राज्यातील उसाचे पूर्ण गाळप होईल. मागील दोन वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी राज्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले होते. प्रत्यक्ष गाळपासाठी ९ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होता. जवळपास सर्व क्षेत्रावरील उसाचे गाळप पूर्ण होत अाले असून, राज्यातील ऊस गाळप हंगामही आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत ९४७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १ कोटी ६  लाख २० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. पुणे, नगर आणि नांदेड विभागातील आणखी १८ कारखाने सुरूच आहेत. येत्या ३० मेपर्यंत गाळप हंगाम सुरू राहील. आतापर्यंत १६९ कारखाने बंद झाले आहेत. गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर यावर्षी किमान ७२० लाख टनाचे गाळप होईल, असा अंदाज साखर तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. परंतु ऊस उत्पादनात वाढ झाल्याने राज्याच्या ऊस गाळपात सुमारे दोनशे टनांनी वाढ अपेक्षित आहे. यावर्षी ऊस पिकासाठी पाऊसमान आणि हवामान पोषक ठरल्याने उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गतवर्षीपेक्षा साखर उतारा ०.०४ टक्क्यांनी घटला आहे. यावर्षी सरासरी साखर उतारा ११.२२ टक्के इतका मिळाला आहे. मागील दहा वर्षांतील उच्चांकी गाळप मागील दहा वर्षांतील गाळपाचे सर्व विक्रमी यावर्षी मोडीत निघाले आहेत. यावर्षी सर्वाधिक ९४७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. २०१४-१५ या  गाळप हंगामात ९३०.४१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यानंतर यावर्षी मागील दहा वर्षांतील गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढून ९४७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या दहा वर्षांतील गाळपाचा हा नवा उच्चांक मानला जात आहे. देशात सर्वाधिक ऊस गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मान यावर्षीही माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने कायम राखला आहे. यावर्षी विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १९ लाख ३७ हजार ५९७ टन उसाचे गाळप करून २१ लाख ९१ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने देशात सर्वाधिक ऊस गाळपाचा विक्रम निर्माण केल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र ननवरे यांनी दिली. राज्यात आत्तापर्यंत ९४७ लाख टन उसाचे गाळप, तर १ कोटी ६ लाख २० टन साखर उत्पादन झाले आहे. १६९ कारखाने बंद झाले आहेत, तर आणखी १८ कारखाने सुरू आहेत. मेअखेरपर्यंत राज्यातील उसाचे गाळप पूर्ण होईल. गतवर्षीपेक्षा अंदाजे २०० टन अधिक गाळप झाले आहे. तर साखर उताऱ्यात घट झाली आहे. मागील दहा वर्षांतील सर्वाधिक गाळप यावर्षी झाले आहे.  - संजय खताळ,  व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर संघ, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com