सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

जळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या उत्पादनातही भारत आघाडीवर असून, चीनपेक्षा अधिक म्हणजेच सुमारे पाच हजार ८०० दशलक्ष किलो सूत उत्पादनाचा अंदाज आहे. याच वेळी देशांतर्गत क्षेत्रात सूत उत्पादनात तमिळनाडूनंतर गुजरात आघाडी घेत असून, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.  भारत यंदाही सूत उत्पादनात जगात अग्रस्थानी असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. देशात यंदाच्या हंगामात आतापर्यंत १८८४ दशलक्ष किलो सुताचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात एकूण ५६६२ दशलक्ष किलो सुताचे उत्पादन झाले होते.  देशात सुमारे २४०० सूतगिरण्या असून, यातील जवळपास १४८ गिरण्या गुजरातेत आहेत. तमिळनाडूमध्ये सुमारे १८८ सूतगिरण्या आहेत. तर महाराष्ट्रात खासगी व सहकारी मिळून १३३ सूतगिरण्या सुरू आहेत.   तमिळनाडू व लगतच्या भागातील गिरण्यांना मिळून यंदाही एक कोटी गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) गरज आहे. महाराष्ट्रात ही गरज सुमारे ४७ लाख गाठी तर गुजरातमधील गिरण्यांना ८० लाख गाठींची गरज आहे. गुजरातमध्ये मागील दोन वर्षांत अत्याधुनिक प्रकारच्या व अधिक उत्पादन क्षमतेच्या ६८ सूतगिरण्या सरकारच्या सहकार्याने उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत व यंदाही गुजरातमध्ये गाठींची मागणी किंवा गरज (कन्झमशन) वाढली आहे.  देशात यंदा दर महिन्याला सूतगिरण्या व इतर युनिट्‌मध्ये मिळून २८ लाख गाठींचा वापर सूतनिर्मितीसाठी झाला आहे. तर दर महिन्याला चार कोटी किलो सुताचे उत्पादन झाले आहे. यातील ४२ टक्के सुताची निर्यात परदेशात झाली आहे. चीनसह आखाती देशांमध्ये सूत निर्यात सुरू असून, यंदा टेरी टॉवेल, चादरी आदींसाठी वापरात येणाऱ्या जाड (कोर्स) सुताची निर्यात सुमारे १२ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. तर बारीक प्रकारचे सूत (फाइन)देखील चीनमध्ये पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले. 

सूत निर्यातीलाही वेग आलेला असल्याने निर्मिती प्रक्रिया गतीने सुरू आहे. दाक्षिणात्य मिलमध्ये ही प्रक्रिया अधिक जोमात सुरू आहे. देशात सूतगिरण्या यंदा बऱ्यापैकी सुरू असल्याने देशांतर्गत मिलची गाठींसंबंधीची गरजही वाढणार आहे. जे आकडे शासकीय संस्था व खासगी संस्थांनी देशांतर्गत मिलमध्ये गाठींच्या वापरासंबंधी जारी केले आहेत, त्यापेक्षा अधिक म्हणजेच सुमारे ३६० लाख गाठींचा वापर सूतगिरण्या व इतर युनिट्‌समध्ये होईल, असा दावा करण्यात आला आहे. वापर अधिक होणार असल्याने शिलकी गाठी व निर्यातीवर निर्भर राहण्याची वेळही येणार नाही. कारण देशात यंदा कमाल ३७० लाख गाठींचे उत्पादन हातील येईल, असे कापूस व्यापारातील संघटना व शासकीय यंत्रणांनी म्हटले आहे. जेवढे उत्पादन येईल, तेवढ्या गाठींचा वापर सूतगिरण्या व लघू उद्योगात (एसएसआय)मध्ये होईल. 

पिमा व गिझासाठी अमेरिकेवर निर्भर देशात पिमा व गिझा या सुमारे ३५ मिलिमीटर लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन होत नसल्याने त्याची आयात सूतगिरण्यांना करावी लागत आहे. त्यासाठी अधिकचे परकी चलन यंदा गमवावे लागेल. कारण डॉलर मागील १४ महिन्यांमधील उचांकी पातळीवर पोचला आहे. डॉलरचे दर वधारल्याने रुपया कमकुवत झाला आहे. सध्या ६६ रुपयांपर्यंत डॉलर आहे. पिमा व गिझा कापसाची आयात गिरण्या किंवा मोठ्या मिल अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया व तुर्कीमधून करीत आहेत. तुर्कीमधून सुमारे अडीच लाख गाठींच्या आयातीचे संकेत मिळाले आहेत. यंदा सुमारे ११ ते १२ लाख पिमा व गिझा प्रकारच्या गाठींची आयात भारत करील, असे सांगण्यात आले. 

देशाच्या सूत उत्पादनात दाक्षिणात्य मिलचा सर्वाधिक वाटा असणार आहे. यानंतर गुजरातचा वाटा असेल. तसेच उत्तरेकडे पंजाब, हरियाना व राजस्थानचा बऱ्यापैकी वाटा सूत उत्पादनात आहे. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे, असे सांगण्यात आले.  

आकडे दृष्टिक्षेपात

  • देशांतर्गत सूतगिरण्या व लघुउद्योगांची गरज (खासगी उद्योगांच्या दाव्यानुसार) : ३६० लाख गाठी
  • दर महिन्याला देशांतर्गत सूतगिरण्यांमध्ये वापर : २८ लाख गाठी
  • देशात सूत उत्पादनाचा अंदाज : पाच हजार ८०० दशलक्ष किलो
  • देशात उत्पादनाचा अंदाज : सुमारे ३७० लाख गाठी
  • पिमा, गिझासह इतर गाठींची देशात आयातीची शक्‍यता : २० लाख गाठी
  • देशांतर्गत सूतगिरण्या, मिलची गरज : २७५ लाख गाठी
  • लहान युनिट्‌स (एसएसआय)ची गरज : ३० लाख गाठी
  • देशांतर्गत मिला व युनिटस्‌ची गरज (शासकीय संस्था व काही संघटनांच्या दाव्यानुसार) : ३२० लाख गाठी
  • देशांतर्गत बाजारातून परदेशांत झालेली निर्यात : ६१ लाख गाठी
  • सूत उत्पादनात भारत आशिया खंडात आघाडीवर असणार आहे. चीनच्या पुढे सूत उत्पादन होईल. कारण चीनमध्ये मजुरी खर्चामुळे वस्त्रोद्योगावर परिणाम झाला असून, चीनने आपला व्यवसाय बांगलादेशातही आणला आहे.  - दीपकभाई पाटील,  अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा  (ता. शहादा, जि. नंदुरबार) देशात सूत उत्पादन वर्षागणिक वाढत आहे. देशांतर्गत सूतगिरण्या व इतर मिलांना यंदा ३६० लाख गाठींची गरज भासणार आहे. देशातच मागणी अधिक आहे. यामुळे शिलकी गाठी किंवा निर्यातीवर अवलंबून राहण्याची गरज मला वाटत नाही. अशात मात्र शासनाने वायदा बाजार, त्यांची आकडेवारी यासंबंधी नियंत्रण आणले पाहिजे. कायदे तयार केले पाहिजेत.  - महेश पाटोदिया, सूतगिरणीचालक, मालेगाव

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com