धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस’ची कपात

धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस’ची कपात
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस’ची कपात

धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून अडतदार धान्य व इतर शेतमाल विक्रीसंबंधी सर्रास शेकडा १ रुपये ८० पैसे टीडीएसच्या नावाने वसुली करीत आहेत. या संदर्भात एका जागरूक कृषी पदवीधर युवा शेतकऱ्याने बाजार समितीला विचारणा केली असता, अडतदारांनी आम्ही आमचा व्यवसाय कसा करावा, वसुली करणारच, अशी भूमिका जाहीरपणे घेऊन ही लूट सुरूच ठेवली आहे.  या संदर्भात हेंदरूण (ता. जि. धुळे) येथील कृषी पदवीधर तथा युवा शेतकरी मोहन भिसे यांनी ॲग्रोवनला आपबीती सांगितली आहे. मोहन यांनी याबाबत पणन संचालक यांनाही एक पत्र लिहून तक्रार केली आहे. मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे बाजार समितीत धान्य मार्केट यार्डात धान्यविक्री केल्यानंतर अडतदार १ रुपये ८० पैसे शेतकऱ्यांकडून वसूल करतात. माझ्या गावातील शेतकऱ्यांनी मला माहिती दिली. मका, ज्वारी, बाजरी यावर मागील सात महिन्यांपासून ही वसुली सर्रास सुरू असल्याचे शेतकरी म्हणाले. मग मी याबाबत मागील आठवड्यात धुळे बाजार समितीत जाऊन थेट अडतदाराला विचारणा केली, तर अडतदाराने आम्ही आमचा व्यवसाय कसा करणार, वसुली तर करावीच लागेल, असे सांगितले. इतर अडतदार  निर्ढावले असून, ही मिलीभगतच आहे. संबंधित अडतदाराला ही वसुली कोणत्या कायद्याने करतात, टीडीएस काय आहे, असे विचारले. त्यावर व्यापाऱ्याला टीडीएसचा अर्थ सांगता आला नाही, असेही मोहन म्हणाले. याबाबत पणन संचालक यांच्याकडे पत्र सादर करून तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा मोहन यांनी व्यक्त केली.  प्रतिक्रिया... माझ्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे धुळे बाजार समितीत टीडीएसच्या नावाने १.८० रुपये वसुलीच्या तक्रारी केल्या. मी याची विचारणा बाजार समितीत अडतदाराला केली असता त्यांनी आम्ही आमचा व्यवसाय टीडीएस वसुलीशिवाय करू शकत नाहीत, असे उलट उत्तर दिले.  - मोहन भिसे,  युवा शेतकरी, हेंदरूण (ता. जि. धुळे)

बाजार समितीत धनादेशांच्या व्यवहारासंबंधी टीडीएस कपात केली जात असेल. पण माझ्याकडे हेंदरूणच्या शेतकऱ्यांची कुठलीही तक्रार नाही. तक्रार आल्यानंतर मी या संदर्भात कार्यवाही करू शकतो.  - जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक, धुळे

टीडीएसच्या नावे अडतदार वसुली करतात याची तक्रार आमच्याकडे नाही. पण असा प्रकार असला तर तक्रारदाराला माझ्याकडे पाठवा. याबाबत चौकशी केली जाईल.  - दिनकर पाटील,  सचिव, धुळे बाजार समिती टीडीएस कपात नियमबाह्य :  पणन संचालक​ पुणे : बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात टीडीएस कपात करणे हे नियमबाह्य असून, अशाप्रकारे कपात केली जात असेल, तर शेतकऱ्यांनी पणन संचालनालयाकडे आणि जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी कराव्यात. संबधित बाजार समिती आणि आडत्यांवर कायदेशीर कारवाई करू, अशी तंबी राज्याचे पणन संचालक दीपक तावरे यांनी दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com