केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी

केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी

अमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पूर्ण निधी खर्चासाठी द्राविडी प्राणायाम केले जात आहेत. त्याअंतर्गत चौकशीत असलेल्या प्रकरणातदेखील पैसे देऊन प्रशासन मोकळे झाल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.  इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर (इफाड) आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्‍त सहकार्याने २०० कोटी रुपयांचा समन्वयित कृषी प्रकल्प राबविण्यात आला. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पूरक व्यवसायाच्या बळावर आर्थिक स्थिरता निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. परंतू शेतकऱ्यांऐवजी प्रकल्प प्रमुख, प्रकल्पात काम करणाऱ्या संस्था आणि कर्मचाऱ्यांचेच आर्थिक हित यातून जपले गेले, असा आरोप आहे.  इफाडने १५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतू प्रकल्पाच्या अंमलबजावणीची गती कमी असल्याने हा पैसा खर्चच होत नव्हता. परिणामी तो बॅंक खात्यात असल्याने त्यावर ४५ ते ५० कोटी रुपयांचे व्याज मिळाले, असे सांगितले जाते. दरम्यान पैसे खर्च होत नसल्याची ओरड होत असल्याने जून २०१८ अखेरीस शिल्लक निधी कोणत्याही मार्गाने खर्च करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याअंतर्गत गैरप्रकाराची चौकशी सुरू असलेल्या संस्थांनादेखील पैसे देऊन मोकळे करण्यात आले. अवघ्या सहा महिन्यात ५० ते ५५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यानंतर आता ३२ कोटी ४० लाख रुपये शिल्लक उरले असताना ते मार्च २०१९ पर्यंत खर्च करा, असे शासनाने कळविले आहे. एका महिन्यात ३२ कोटी कशावर खर्च होणार, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. शनिवारी (ता. १६) हे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे महिनाभरात हा निधी कशावर आणि कसा खर्च होईल, याविषयी उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०१८ नंतर कोणताही निधी देण्यास इफाड इच्छुक नव्हते. संस्थेच्या पोल्ट्री कागदावर दुर्गम मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात दीड कोटी रुपये खर्चून ८१ पोल्ट्री प्रस्तावित करण्यात आल्या. त्यात ५०० पक्षी, शेड उभारणीची कामे करावयाची होती. ही कामे दर्जाहिन झाल्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले. त्या संस्थेचे पेमेंट त्यानंतर थांबविण्यात आले होते. असे असताना आता पैसे खर्च करायचे म्हणून संस्थेला पैसे देण्यात आल्याचे सूत्र सांगतात. त्याही पुढे जात आता परत नव्याने १३ कोटीतून २०० धारणी तसेच २०० यवतमाळमध्ये पोल्ट्री उभारण्याचे प्रस्तावित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com