ब्राॅयलर पक्षी व्यवस्थापनात ब्रुडिंग, तापमानाकडे द्या लक्ष

ब्राॅयलर पक्षांना शेडमध्ये वयोमानानुसार योग्य प्रमाणात जागा पुरवावी.
ब्राॅयलर पक्षांना शेडमध्ये वयोमानानुसार योग्य प्रमाणात जागा पुरवावी.

व्यावसायिक ब्रॉयलर कुक्कूटपालनामध्ये ऋतूमानानुसार व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ब्रायलर पक्ष्यांची वाढ ही अतिशय झपाट्याने होत असते केवळ ३५ ते ४२ दिवसांत पक्षी विक्रीसाठी तयार होतात. त्यामुळे पिले आल्यापासून ते त्याची विक्री होईपर्यंत त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वर्षभरामध्ये ब्रॉयलर पक्षांचे योग्य ते उत्पादन मिळविण्याकरिता वातावरणानुसार व्यवस्थापनामध्ये विविध बदल करावे लागतात. ब्राॅयलर पक्ष्यांच्या व्यवस्थानातील महत्त्वाच्या बाबी १) शेडची बांधणी अपेक्षित उत्पादनासाठी शेेडची वैज्ञानिक पद्धतीने बांधणी केलेली असावी. शेडची जागा गाव, वस्ती, शहर, गर्दीचे ठिकाण, औद्योगिक वसाहत अाणि विमानतळ इत्यादीपासून दूर असावी. शेेड उभारताना बाजारचे ठिकाण, मागणी आणि वार्षिक वाढ लक्षात घ्यावी. जमीन सखल, दलदलमुक्त असावी. तापमान, वार्षिक पर्जन्यमान व सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण लक्षात घेणे गरजेचे असते, जेणेकरून नियोजित आराखड्यामध्ये बदल करता येईल. नियोजित जागेवर वीज अाणि स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. शेडची उभारणी पक्ष्यांची संख्या, उपलब्ध असलेली जागा आणि गुंतवणूक यावरुन ठरवावी. शेेेडची लांबी पूर्व-पश्चिम दिशेेस आसावी जेणेकरून शेडमध्ये हवा योग्य प्रमाणात खेळती राहील आणि अतिनिल सूर्यप्रकाश किरणांपासून पक्ष्यांचा बचाव होईल. शेडची लांबी आवश्यकतेनुसार ४०-३०० फुटापर्यंत ठेवता येते, पण रूंदी ही २५ ते ३३ फूट (८ ते १० मिटर) असणे आवश्यक असते. शेेेडची कमीत कमी रूंदी १६ फूट असावी. शेेडच्या बाजूच्या भिंतींची उंची आतील जागेच्या समांतरापासून १ फुटापेक्षा जास्त नसावी व वरच्या बाजूस जमिनीकडे उतार ठेवावा, त्यामुळे पक्ष्यांना भिंतीवर बसता येणार नाही. शेडच्या बाजूच्या भिंतीपासून छतापर्यंत वेल्डिंग जाळी बसवावी. जाळीची उंची ७-८ फूट असावी. जाळीचा आकार २.५ ते ५ सें.मी. अाणि १२-१४ गेज जाडीची असणे आवश्यक असते. जेणेकरून पक्ष्यांचा सरपटणारे प्राणी, कुत्रे व चोरांपासून बचाव होईल. २) पिलांची खरेदी ब्रायलर पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने व्हेनकाॅब, हबवर्ड, राॅस, लोहमन, हबचिक्स इ. अशा विविध नावाने उपजाती उपलब्ध आहेत. पालनाकरिता चांगले अनुवंशिक गुणधर्म असलेले पक्षी म्हणजेच जलद वाढ, उत्तम रोग-प्रतिकारक क्षमता, कमी मरतुकीचे प्रमाण, मांसल व पुष्ट स्नायू आणि खाद्याचे मांसात जास्त रूपांतर करण्याची क्षमता असणाऱ्या पक्षांची निवड करावी. नामवंत उबवणी केंद्रातून उत्तम उत्पादनक्षमता असलेल्या पिलांची खरेदी करावी. ३) जागेचे प्रमाण ब्रायलर पक्ष्यांना वयोमानानुसार योग्य प्रमाणात जागा पुरवावी. अति जास्त जागा किंवा कमी जागा दिल्यास पक्षांच्या वाढीवर विपरित परिणाम होतात. सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या योग्य वाढीसाठी खालील प्रमाणात जागा द्यावी. १ आठवडा - ०.३ चाै. फूट २ आठवडा - ०.४ चाै. फूट ३ आठवडा - ०.५ चाै. फूट ४ आठवडा - १.० चाै. फूट ५ आठवडा - १.० चाै. फूट ६ आठवडा - १.० ते १.२ चाै. फूट वरीलप्रमाणे पक्ष्यांना जागा दिल्यास पक्ष्यांची वाढ योग्य त्या प्रमाणात होते व त्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते. जागेमधील व्यवस्थापनात ऋतुमानानुसार बदल करावा. यामध्ये प्रामुख्याने उन्हाळयामध्ये १०-१५ टक्के जागा जास्त द्यावी, त्यामुळे पक्ष्यांचा उष्माघातापासून बचाव होईल. ४) ब्रुडिंग व्यवस्थापन

  • अंड्यातून बाहेर आलेल्या पिलांना पहिल्या दिवसापासून तीन आठवड्यापर्यंत कृत्रिमरित्या उष्णता उब देऊन त्यांची जोपासना करावी लागते, यास ब्रुडिंग असे म्हणतात. ऋतुमानानुसार ब्रुडिंगचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो.
  • पिलांच्या शरीराचे तापमान हे ४१ ते ४२ अांश सेल्सिअस इतके असते. लहान पिले हे वातावरणातील तापमान बदलाला तेवढी तयार नसतात जेवढे मोठे पक्षी वातावरणातील तापमानाचा बदल सहन करतात कारण पिल्लांची बाहेरील तापमान सहन करण्यासाठी आवश्यक शारीरिक अवयवाची वाढ व आवश्यक तापमान नियंत्रण विभाग विकसित झालेला नसतो. त्यामुळे त्यांना सुरवातील कृत्रिमरित्या उष्णता/ऊब देणे आवश्यक असते.
  • ऋतुमानानुसार पिलांना ऊब देण्याच्या व्यवस्थापनात बदल करावा. सुरवातील तीन आठवडे लहान पिलांचे संगोपण चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. कारण, त्यावरच पुढील उत्पादन/वाढ अवलंबून असते.
  • पिलांना कृत्रिम उष्णता/उब देण्याकरिता विविध उपकरणांचा वापर केला जातो त्याला ब्रुडर असे म्हणतात. ब्रुडर हे पिले येण्यापूर्वी ६-८ तास अगोदर जमीनीपासून दोन ते तीन फूट उंचीवर सुरू करून ठेवावीत.
  • आवश्यकतेनुसार त्यांची उंची कमी-जास्त करावी परंतु त्यांचा पिलांना स्पर्श होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • पहिल्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत प्रत्येक आठवड्याला ५ अंश फॅरनहाइट ने तापमान कमी करावे. बऱ्याच वेळा शेडचे तापमान प्रमाणात ठेवणे आवघड जाते अशा वेळी जर विजेच्या बल्बचे ब्रुडर वापरल्यास प्रत्येक पिलांला २ वॅट हिवाळ्यामध्ये व १ वॅट उन्हाळ्यामध्ये या प्रमाणात ब्रुडरला बसवून कृत्रिम ऊर्जा द्यावी.
  • उदा. हिवाळ्यात २०० पिलांचे ब्रुडिंग करण्याकरिता एक बांबुची किंवा पत्र्याची टोपली घेउन त्यामध्ये १०० वॅटचे ४ बल्ब लावून असे ४०० वॅटच्या साह्याने कृत्रिम उष्णता द्यावी.
  • कृत्रिम उष्णता देताना पिलांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवावे. दिलेल्या जागेमध्ये सर्व पिले सम प्रमाणात विखुरलेली असतील, तर दिलेली उष्णता ही योग्य आहे हे लक्षात ठेवावे. जर पिले ब्रुडरच्या खाली एकत्रित जमा होत असतील, तर त्यांना आणखी उष्ण्तेची गरज आहे, त्यासाठी आणखी एकदा बल्ब वाढवावा किंवा जास्त वॅटचे बल्ब लावावेत जर ती पिले ब्रुडर खालून दूरवर जात असतील, तर त्यांना दिलेली उष्णता जास्त आहे हे लक्षात घ्यावे. अशा वेळी एखादा बल्ब कमी करावा किंवा ब्रुडरची उंची वाढवावी.
  • ब्रुडिंगसाठी विजेचे दिवे, इन्फ्रारेड ब्रुडर, गॅस ब्रुडर, कोळसा शेगडी, गॅस बत्ती अाणि राॅकेल स्टोव्ह अशा उपकरणाचा वापर केला जातो.
  • विजेचे दिवे व गॅस ब्रुडरचा वापर ब्रुडिंगसाठी करणे फायद्याचे ठरते, त्यामुळे पक्षाला व्यवस्थित कृत्रिम उष्णता देता येते दिलेल्या जागेत सर्व पिले सम प्रमाणात प्रत्येक वेळी विखुरलेली असणे हेच खरे चांगल्या ब्रुडिंगचे लक्षण आहे हे लक्षात ठेवावे.
  • ५) तापमान

  • पिलांना सुरवातीचे तीनआठवडे वरीलप्रमाणे तापमान देणे आवश्यक आहे त्यानंतर पक्ष्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २७ अंश सेल्सिअस एवढे शेडचे तापमान ठेवणे फायदेशीर ठरते.
  • पक्ष्यांची उत्पादकता ही बऱ्याच अंशी वातावरणातील तापमानावर अवलंबून असते. २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि १२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा पक्ष्यांच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
  • हिवाळा पक्ष्यांच्या वाढीच्या दृष्टीने चांगला ऋुतु मानला जातो. कारण, हिवाळ्यात पक्ष्यांची वाढ चांगल्याप्रकारे होते. उन्हाळ्यात तापमान ३५-४५ अंश सेल्सिअस वर जाते अशावेळी तापमान नियंत्रित करण्यासाठी पऱ्यावरती पांढरा रंग, छतावरती स्प्रिकलर, शेडमध्ये फाॅगर, पंखे, कुलर, एक्झाॅस्ट फॅन अशा विविध उपकरणांचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवता येते.
  • ६) वायुवीजन

  • पक्ष्यांच्या चांगल्या वाढीसाठी शेडमध्ये खेळती हवा असणे गरजेचे आहे. ब्रुडिंगच्या वेळी आवश्यकतेनुसार किंवा दुपारच्या वेळेस पडदे उघडे करून ठेवावेत. शेडमध्ये खेळती हवा राहिल्यास कार्बन डायआॅक्साईड वायु बाहेर जाण्यास मदत होईल.
  • उष्णता व आर्द्रता कमी होउन लिटर कोरडी राखण्यास मदत होईल, पिले १० दिवसांची झाल्यानंतर शेडचे पडदे उघडे ठेवावेत व आवश्यकतेनुसार त्यांना खाली वर करावे. शेडमध्ये वायुवीजनचे प्रमाण १०-३० मिटर प्रति मिनिट किंवा ३०-१०० क्युबीक मिटर प्रति हजार किलो वजन एवढे असावे.
  • शेडमध्ये हवेतील आॅक्सिजन २० टक्के पेक्षा अधिक आणि कार्बन डायआॅक्साईड चे प्रमाण ०.५ टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शेडमधील अमोनियाचे प्रमाण २५ टक्के पेक्षा कमी असावे.
  • शेडमध्ये खेळती हवा ठेवण्यासाठी पंखे व एक्झाॅस्ट फॅनचा वापर करावा. आवश्यकतेपेक्षा जास्त हवा टाळावी अशावेळी जाळ्यावर बसवलेल्या पडद्याचा वापर करून हवेवर नियंत्रण ठेवावे.
  • ७) आर्द्रता

  • पक्ष्यांच्या योग्यवाढीसाठी शेडमधील आर्द्रता ५०-६० टक्के असावी. आर्द्रता अधिक झाल्यास शेडमधील लिटर अोले होण्यास सुरवात होते, त्यामुळे शेडमधील अमोनियाचे प्रमाण वाढते. त्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पक्ष्यांच्या वाढीवर परिणाम होतो.
  • आर्द्रता अधिक कमी झाल्यास गादी एकदम कोरडी होते व त्यातील धुळीचे कण पक्ष्यांच्या श्वसनलिकेत जातात, त्यामुळे श्वसनसंस्थेचे रोग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आर्द्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य वायुवीजन असणे आवश्यक आहे.
  • ८) प्रकाश

  • ब्राॅयलर पक्ष्यांच्या योग्य वाढीसाठी पक्ष्याला नैसर्गिक प्रकाशाबरोबर कृत्रिम प्रकाश देणे आवश्यक आहे. ब्रुडिंग करतेवेळी प्रकाशासाठी शेडमध्ये ठराविक अंतरावर बल्ब लावून पिलांना २४ तास प्रकाश द्यावा.
  • प्रकाश देण्याकरिता ६० वॅटचा बल्ब प्रति २०० पक्षांना २.१ मिटरच्या ठराविक अंतरावर लावावेत. प्रकाशामुळे पक्ष्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे स्त्राव शरीरग्रंथीना सोडण्याची चालना देतो व पक्ष्यांच्या वाढीस मदत करतो. त्यामुळे ब्राॅयलर पक्ष्यांमध्ये २४ तास प्रकाश देणे फायदेशीर आहे व गरजेनुसार रात्रीच्या वेळी पक्षी मोठे झाल्यानंतर १ - २ तास अंधार/काळोख ठेवण्यास हरकत नाही.
  • संपर्क ः डाॅ. के. के. खोसे, ९४२२६४६५२९ (कुक्कुटपालनशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com