अशी करा मत्स्यशेतीची पूर्वतयारी...

मत्स्यतळ्यातील संहारक मासे, वनस्पती अाणि किडे जाळे टाकून काढून टाकावेत.
मत्स्यतळ्यातील संहारक मासे, वनस्पती अाणि किडे जाळे टाकून काढून टाकावेत.

मत्स्यबीज संगोपनाचे यश हे तळ्याच्या पूर्वतयारीवरच अवलंबून असते. त्यामुळेच पूर्व तयारी कशाप्रकारे करायची व त्याचे काय फायदे आहेत, या तांत्रिक बाबींची माहिती मत्स्यबीज संगोपनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तळ्याच्या पूर्वतयारीवरच मत्स्यजी-यांच्या जगणुकीचे प्रमाण कमीअधिक होत असते. योग्य पूर्व तयारीमुळे मत्स्यजी-यांना लागणारे नैसर्गिक खाद्य म्हणजे "प्लवंग'' तळ्यात तयार होते. हे प्लवंग मत्स्यजी-यांचे प्रमुख नैसर्गिक खाद्य आहे. तळ्याची पूर्वतयारी खालीलप्रमाणे करावी. १) तळे सुकविणे/ तलाव कोरडा करणे. २) तळे सुकविणे शक्‍य नसल्यास, अ) हानिकारक माशांचे निर्मूलन ब) वनस्पती व तणाचे निर्मूलन ३) तळ्याची नांगरणी ४) चुन्याची मात्रा देणे. ५) किड्यांचा नायनाट (ऑईल इमल्शन) ६) खतमात्रा १) तळे सुकविणे/ तलाव कोरडा करणे ः प्रत्येक मत्स्य उत्पादनानंतर तळ्यातील पाणी पूर्णपणे काढून तळे कोरडे करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर साधारण १५ ते २० दिवस तळ्यास भेगा पडेपर्यंत तळ सुकवावा. यामुळे तलावात तयार होत असलेले विषारी वायू बाहेर पडतात. तसेच हानिकारक जिव-जंतूंचा नाश होण्यास मदत होते. मत्स्यबीज संगोपनासाठी वापरण्यात येणाऱ्या काही तलावात नैसर्गिकरीत्या अथवा पुराद्वारे काही मत्स्यसंहारक माशांनी प्रवेश केला असल्यास, तलाव कोरडा केल्यानंतरही हे मासे तळ्यात ओलावा असलेल्या जमिनीत टिकून राहतात. जसे, की नारशिंगाळा इत्यादी. हे मासे हवेतील ऑक्सिजन घेऊ शकतात व त्याद्वारे तशा ओलावा असलेल्या जमिनीत सुद्धा टिकून राहतात. त्यामुळे तलावातील १ ते २ फूट जमा झालेला गाळ दरवर्षी काढावा. असा गाळ काढत असतानाच वरील प्रकारचे मासे आढळल्यास त्यांचा नायनाट करता येतो. तळ्यातील मातीचा थर वरून पूर्ण सुकलेला दिसतो, पण त्याच्या खाली असे मासे लपून बसतात. ह्या माशांमुळे मत्स्यबीजांचे जगणुकीचे प्रमाण कमी मिळते. या माशांचा ब्लिचिंग पावडर टाकूनसुद्धा नायनाट करता येतो. पण असे मासे तळ्यात नसल्याची खात्री करून घेणे आवश्‍यक आहे. जेणेकरून माशांचे नायनाट होवून तळे वापरण्याजोगे होईल. २) तळे सुकविणे शक्‍य नसल्यास ः अ) हानिकारक माशांचे निर्मूलन ः हानिकारक मासे जसे, की नारशिंगाळा, शिवडा इत्यादी मासे संगोपन तळ्यात असतील तर मत्स्यबीजाचे जगणुकीचे प्रमाण कमी मिळते. त्यामुळे अशा माशांचा नायनाट करणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे मत्स्यजी-यांसोबत अन्न, प्राणवायूसाठी स्पर्धा करतात. जाळे टाकून असे मासे काढून घ्यावेत. जाळ्या द्वारेही मासे पूर्णपणे निघाले नाही तर मोहाची पेंड २०० ते २५० किलो/ हेक्‍टरी अथवा चहाच्या बियांची पावडर (टी सीड केक) २५० ते ३०० किलो / हेक्‍टर अथवा ब्लिचिंग पावडर २५० ते ३०० किलो/ हेक्‍टरी या प्रमाणात वापरून माशांचा नायनाट करावा. ब) वनस्पती व तणांचे निर्मूलन ः तळ्यात अनावश्‍यक वनस्पती वाढल्यास जाळे टाकण्यास अडथळा होतो. तसेच, जाळे फाटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तळ्यातील पोषक अन्नद्रव्यांचा वनस्पती वापर करतात, वनस्पतींवर बेडूक त्यांची पिल्ले तसेच इतर कीटक आश्रय घेतात. तळ्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. मत्स्यबीजास वाढीस अडचण येते. सूर्यप्रकाश तळापर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो. अशा कारणांमुळे वनस्पती व तणांचे निर्मूलन करणे आवश्‍यक असते. निर्मूलनासाठी हाताने काढणी/ यांत्रिक पद्धतीने काढणी, रासायनिक पद्धत अाणि जैविक पद्धतीचा अवलंब केला जातो. ३) तळ्याची नांगरणी ः तळ्याची नांगरणी ४ ते ५ इंच वरच्या थरापासून करणे आवश्‍यक आहे. यामुळे मातीची सुपीकता वाढविता येते. त्यामुळे मातीतील नैसर्गिक अन्नद्रव्ये पाण्यात लवकर मिसळण्यास मदत होते व त्याद्वारे पाण्याची नैसर्गिक उत्पादकता वाढून नैसर्गिक खाद्य (प्लवंग) भरपूर प्रमाणात तयार होण्यास मदत होते. संपर्क ः रविंद्र बोंद्रे, ९४२३०४९५२० (तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com