पूर्वतयारीनेच करा मत्स्यबीजाचे संवर्धन

 संगोपन तलावामध्ये मत्स्यजिरे सोडण्यापूर्वी प्रथम पाणकिडे काढून टाकावेत.
संगोपन तलावामध्ये मत्स्यजिरे सोडण्यापूर्वी प्रथम पाणकिडे काढून टाकावेत.

मत्स्यसंवर्धनामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास तळ्यात मत्स्यबीज सोडण्यापूर्वी मत्स्य तलावाची पूर्वतयारी शास्त्रीय पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने तलावाची दुरुस्ती, संहारक व निरुपयोगी माशांचे निर्मूलन, तलाव सुकविणे, तलावाची नांगरणी, चुना व खताचा वापर योग्य रितीने झाला असेल तर अशा तलावामधून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.   मत्स्यतळ्याचे उत्पादन हे तळ्यातील मातीच्या भाैतिक रासायनिक व जीवशास्त्रीय गुणधर्मावर अवलंबून असते. भाैतिक गुणधर्मात मातीचा पोत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता तसेच रासायनिक गुणधर्मात पीएच, सेंद्रिय कार्बन, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद हे महत्त्वाचे घटक अाहेत. या घटकांना गृहीत धरून तळ्याचे व्यवस्थापन करावे. १) तलाव सुकविणे व नांगरणी

  • मत्स्यसंवर्धन तलावातील संपूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर तलाव कमीत कमी १० ते १५ दिवस तरी उन्हात सुकविला पाहिजे.
  • तळाचा कमीत कमी १ ते २ से.मी. खोली पर्यंतच्या भागात भेगा पडल्या म्हणजे तळे कोरडे झाले असे समजावे.
  • तळे सुकविल्यानंतर तळ्याचा तळ उंच सखल असेल तर तो एकसमान पातळीत करून घ्यावा.
  • तळे नांगरून घ्यावे किंवा वरचा थर हलकेच खोदून ढेकळे वरखाली करावीत. त्यामुळे तळाची माती तापेल व त्यामधील दूषित वायू, किडे, निरुपयोगी किंवा उपद्रवी माशाची अंडी असल्यास त्याचा नायनाट होऊन सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यास मदत होईल व मत्स्य तळ्याची उत्पादकता वाढेल.
  • २) संहारक माशांचे निर्मूलन

  • मत्स्यसंवर्धन करण्यापूर्वी तळे उन्हाळ्यात पूर्णपणे सुकले नसेल तर तलावात वारंवार जाळे फिरवून उपद्रवी मासे काढून टाकावेत.
  • या उपायानेसुद्धा तळयात उपद्रवी मासे राहत असतील तर रासायनिक किंवा नैसर्गिक वनस्पतिजन्य विषाचा वापर करावा यामध्ये प्रामुख्याने ब्लिचिंग पावडर, मोहाची पेंड, डेरीस रूट पावडर, टी सीड केक यांचा समावेश होतो. यापैकी आपल्या भागामध्ये सहजासहजी उपलब्ध असलेल्या कोणत्याही एका घटकाचा वापर खालीलप्रमाणे करावा.
  • नाव---प्रमाण (किलो/हेक्टर) मोहाची पेंड---२०००-२५०० डेरीस रूट पावडर---१५-२० ब्लिचिंग पावडर (३० टक्के क्लोरीन)---३५० अनहायड्रस अमोयनिया---२०-२५ पीपीएम ३) तलावाला चुन्याची मात्रा देणे

  • तलावातील पाण्याचा सामू हा साधारणपणे ७ ते ८.५ च्या दरम्यान असेल तर माशांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
  • सामू वाढला असेल किंवा कमी झाला असेल तर प्रथम पाणी बदलावे हा उपाय लवकरात लवकर करावा किंवा प्रति हेक्टरी २ लीटर आंबविलेले गुळाचे द्रावण वापरावे.
  • पाण्याचा सामू कमी करण्याकरिता जिप्समचा वापर केला जातो. तलावातील सामूनुसार खालीलप्रमाणे चुन्याचा वापर करावा.
  • सामू---चुन्याचे प्रमाण (किलो/हेक्टर) ४ - ४.५---१००० ४.५ - ५.५---७०० ५.५ - ६.५---५०० ६.५ - ७.५---२०० ड) खतमात्रा

  • मत्स्यसंवर्धनासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही प्रकारच्या खतांचा वापर केला जातो. माशांच्या वाढीसाठी तलावात वनस्पती व प्राणीजन्य प्लवंगाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे.
  • मत्स्यसंवर्धनामध्ये शेणखत, पेंड किंवा कंपोस्ट खताचा वापर केला जातो. रासायनिक खतांमध्ये प्रामुख्याने युरीया, सिंगल सुपर फाॅस्फेटचा वापर केला जातो.
  • -तलावाला खतांची मात्रा दिल्यानंतर एक आठवडाभरात तळ्यातील पाण्याला हिरवा रंग आल्यानंतर मत्स्यबीजाची साठवणूक करावी.
  • इ) किड्यांचा नायनाट करणे

  • संगोपन तलावामध्ये मत्स्यजिरे सोडण्यापूर्वी प्रथम पाणकिडे काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते.
  • मत्स्य जिरे सोडण्याच्या दोन दिवस अगोदर वातावरण ढगाळ नसेल, वाऱ्याचे प्रमाण कमी असेल त्यावेळी साबण व तेल यांच्या मिश्रणाचा फवारा करावा.
  • पातळ तवंग पाण्याच्या पृष्ठभागावर जमा होऊन किड्यांच्या श्वसनात अडथळा येऊन पाणकिडे मरून पाण्याच्या पृष्ठभागावर येतात.
  • साबण व तेल यांचे मिश्रण खालील पद्धतीने बनविता येते.
  • १. पहिली पद्धत ः केरोसीन १००-२०० लिटर/हेक्टर किंवा डिझेल ७५ लिटर/ हेक्टर व साबणाची पावडर २-३ किलो/हेक्टर यांचे एकत्रित मिश्रण करून फवारा करावा. २. दुसरी पध्दत ः वनस्पती तेल ५६ किलो/हेक्टर व साबणाची पावडर १८ किलो/हेक्टर यांचे एकत्रित मिश्रण करून फवारा करावा. फवारा हा पाण्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर करावा.   संपर्क ः डाॅ. अजय सोनवणे, ९६६५१५७७११ (मत्स्यविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com