अोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजार

अोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजार
अोळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे आजार

प्रजनन संस्थेशी निगडित संसर्गजन्य रोगांचा प्रसार टाळण्याकरिता तसेच उच्च प्रतीचे आनुवंशिक गुणधर्म असलेले वासरू निर्माण होण्याकरिता नेहमी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून माजावर आलेल्या जनावरात कृत्रिम रेतन करून घ्यावे. नैसर्गिक फलन प्रक्रिया टाळावी. गर्भाशयाच्या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट निदान झाल्यास असे जनावर उर्वरित जनावरांपासून वेगळे ठेवावे. प्रजनन संस्थेचे आजार हे नर व मादी जनावरांमध्ये होणारे प्रजनन संस्थेचे आजार अशा दोन मुख्य भागात विभागले जातात. सर्वप्रथम नर जनावरांचा विचार केला असता, असे आढळून येते की नर जनावरे ही प्रजनन संस्थेच्या आजारांचे संक्रमण मादी जनावरांत होण्याकरिता प्रामुख्याने जबाबदार असतात. नैसर्गिक फलन प्रक्रियेदरम्यान जर एखाद्या मादी जनावरास प्रजनन संस्थेचा संसर्गजन्य आजार असल्यास (उदा. ब्रूसेल्लोसिस, लेप्टोस्पायरोसिस, ट्रायकोमोनियासिस) तो आजार नैसर्गिक फलन प्रक्रियेदरम्यान नर जनावरांच्या माध्यमातून दुसऱ्या निरोगी मादी जनावरांत संक्रमित होतो. प्रजनन संस्थेचे अाजार

  • गाय, म्हैस व शेळ्यांमधे प्रजनन संस्थेशी निगडित आजार नियमित दिसून येतात, जसे गर्भाशयात पू जमा होणे, कृत्रिम वा नैसर्गिक फलन केलेले जनावर वारंवार उलटणे/गाभण न राहणे, गाभण काळात ७ ते ८ न्या महिन्यात गर्भपात होणे, नैसर्गिक फलन/कृत्रिम रेतनानंतर जनावर २ - ३ महिन्यांनी माजावर येणे, व्याल्यानंतर जार अडकणे, गाभण काळात गर्भाशय बाहेर येणे, गर्भाशय बाहेर येणे/उलटणे.
  • व्याल्यानंतर जार अडकणे व गर्भाशयात पू जमा होणे याचा निश्चित असा संबंध आहे. व्याल्यानंतर गर्भाशयातून जार ६ ते १२ तासात नैसर्गिकरीत्या बाहेर पडला पाहिजे. परंतु जार १२ तासापेक्षा जास्त वेळ बाहेर पडला नाही तर अशा अडकलेल्या जारापासून गर्भाशयात जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयात पू जमा होतो. अशा जनावराची दुग्ध उत्पादन क्षमता लक्षणीयरीत्या कमी होते व जनावर पुन्हा गाभण राहण्यास अयोग्य होते. त्यासाठी त्वरित तज्ज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन उपचार करून घेणे आवश्यक आहे.
  • नैसर्गिक फलन प्रक्रियेदरम्यान संसर्गजन्य आजार असलेल्या नर जनावरांच्या माध्यमातून दुसऱ्या निरोगी मादी जनावरांत जंतुसंसर्ग संक्रमित होऊन गर्भाशयात पू जमा होतो. अयोग्य पद्धतीने कृत्रिम रेतन केल्यानेदेखील जनावरांत जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयात पू जमा होतो व असे जनावर पुन्हा गाभण राहण्यास अयोग्य ठरते.
  • लक्षणे व कारणे

  • जनावरे माजावर आल्यानंतर योग्य वेळेत म्हणजे सकाळी माजाची लक्षणे दाखविल्यास त्याच दिवशी संध्याकाळी किंवा संध्याकाळी माजाची लक्षणे दाखविल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून कृत्रिम रेतन करावे.
  • अयोग्य वेळी कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणा होत नाही व असे जनावर माज दाखविलेल्या दिवसा पासून बरोबर २१ दिवसांनी माजावर येते. याला जनावर वारंवार उलटणे असे म्हणतात.
  • माजावर आलेल्या जनावर जर नैसर्गिक फलन प्रक्रियेद्वारे फळविल्यास, वापरलेल्या वळूच्या वीर्याची प्रत चांगली नसल्याने तसेच प्रजनन संस्थेचा संसर्गजन्य आजार (उदा. ब्रूसेलोसिस, लेप्टोस्पायरोसिस, ट्रायकोमोनियासिस) संक्रमित झाल्याने असे जनावर वारंवार उलटते व गाभण राहत नाही.
  • कृत्रिम वा नैसर्गिक फलन केलेली जी जनावरे २ ते ३ महिन्यानंतर उलटतात / माज दाखवतात अशी जनावरे गाभण राहिलेली नसतात, परंतु संप्रेरकांच्या असंतुलना मुळे किंवा आवश्यक अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे अशी जनावरे पुढील २१ दिवसांनी माज दर्शवत नाही. अशा जनावरांची गर्भधारणा तपासणी करून न घेतल्याने ही जनावरे गाभण वाटतात.
  • काही जनावरे गर्भधारणा तपासणीत गाभण आढळतात, परंतु गर्भधारणेच्या पहिल्या २-३ महिन्याच्या कालावधीत प्रामुख्याने आवश्यक अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे गर्भाशयात तयार झालेला गर्भ नाश पावतो व अशी जनावरे पुन्हा माज दाखवितात. कमी दिवसांचा गर्भ नाश पावला असल्याने तो दिसून येत नाही.
  • ज्या जनावरांमध्ये गाभण काळात ७ ते ९ महिन्यात गर्भपात होतो अशा जनावरामध्ये ब्रूसेल्लोसिस या संसर्गजन्य अाजाराचा संसर्ग असू शकतो. त्यासाठी जनावराची तपासणी करून घेणे अावश्‍यक असते. गर्भपात झालेल्या जनावरात जार अडकलेला असतो, वासराच्या केस, त्वचा पूर्णपणे विकसित झालेले नसतात. अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
  • गर्भपात झालेले जनावर पुढील माज व्यवस्थित दाखवते, शिवाय नियमित गाभणदेखील राहते, परंतु पुढील गर्भधारणेदरम्यान गर्भपात होतो किंवा होत नाही. परंतु अशी जनावरे ब्रूसेल्लोसिस या संसर्गजन्य रोगाकरिता नेहमी वाहक म्हणून राहतात व या रोगाचा प्रसार करतात. अशा जनावरांपासून जन्माला आलेले वासरूदेखील या संसर्गजन्य रोगाचा प्रसार करते.
  • गाभण काळात जनावरांची योग्य निगा न राखल्यास मायांग (गर्भाशय) बाहेर येण्याची समस्या उद्भवते. गाभण जनावरांना संतुलित आहार न दिल्यास, मुबलक पिण्याचे पाणी न दिल्यास, आवश्यक क्षार, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे गाभण जनावरांच्या शरीरात संप्रेरकांचे असंतुलन होऊन गर्भधारणा कालावधीत गर्भाशय वारंवार बाहेर येते. अशा परिस्थितीत योग्य वेळेस योग्य औषधोपचार न केल्यास गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.
  • उपाययोजना

  • गाभण काळात सातव्या महिन्यादरम्यान जनावराचे दूध काढणे क्रमशः कमी करत पूर्ण बंद करावे. परंतु बरेचसे पशुपालक गर्भधारणा कालावधीतदेखील दुग्ध उत्पादन घेतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम त्या जनावराच्या आरोग्यावर होऊन शरीरात मूलभूत अन्नद्रव्याची कमतरता (उदा. कॅल्शियम, फॉस्फरस इ.) निर्माण होते. व्यायल्यानंतर काही जनावरात लगेच पूर्ण गर्भाशय वारंवार बाहेर येते. यावर उपाय म्हणून जनावरे खरेदी करताना ती संसर्गजन्य आजारा पासून मुक्त आहेत ना याची खात्री तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून करूनच जनावरे खरेदी करावीत.
  • नवीन जनावर कळपात आणल्यावर त्याचे काही दिवस निरीक्षण करावे अाणि त्याला इतर जनावरांपासून वेगळे बांधावे. एखाद्या गाभण जनावराचा गर्भपात झाल्यास कोणत्या महिन्यात गर्भपात झाला याची नोंद ठेवून त्याचे निदान तज्ञ पशुवैद्यकामार्फत प्रयोगशाळेत करून घ्यावे. जर गर्भधारणा केलेल्या जनावरात गर्भपात गर्भधारणा कालावधीच्या ७ ते ९ महिन्याच्या दरम्यान झाला असल्यास, ब्रूसेल्लोसिस या संसर्गजन्य रोगाकरिता त्या जनावराची तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत प्रयोगशाळेत चाचणी करून घ्यावी. या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट निदान झाल्यास असे जनावर उर्वरित जनावरांपासून वेगळे ठेवावे.
  • कळपातील वासरांचा ब्रूसेल्लोसिस या संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्याकरिता उपलब्ध असलेली लस तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत टोचून घ्यावी.
  • जनावर माजावर आल्यापासून १२ तासाच्या अात कृत्रिम रेतन करून घ्यावे. जनावर सकाळी माजावर आल्यास त्याच दिवशी संध्याकाळी व संध्याकाळी माजावर आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन करावे.
  • कृत्रिम रेतन केल्याच्या तारखेची नोंद ठेवून त्या दिवसापासून २१ दिवस त्या जनावरावर लक्ष ठेवावे. या कालावधीत माजाची लक्षणे न दिसल्यास असे जनावर कृत्रिम रेतनाच्या ९० दिवसानंतर तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून गर्भ धारणेकरिता तपासून घ्यावे.
  • गर्भधारणा झालेल्या जनावरास संतुलित आहार द्यावा. गर्भधारणेच्या ७ व्या महिन्यादरम्यान अशा जनावराचे दूध काढणे क्रमशः कमी करत पूर्ण बंद करावे.
  • जनावर गाभण असून दूध देत नसल्यावरदेखील अशा जनावरास संतुलित आहार व खनिज मिश्रण द्यावीत. या कालावधीत गर्भाशयात वासराची वाढ झपाट्याने होत असल्याने त्या जनावराच्या व वासराच्या वाढीकरिता उपयुक्त अन्नद्रव्याकरिता असा संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा असतो.
  • संपर्क ः डॉ. चेतन लाकडे, ०८०८७१०९८७८ (पशुप्रजननशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com