मुंबईत उद्यापासून रंगणार माणदेशी महोत्सव

माणदेशी नृत्य
माणदेशी नृत्य

मुंबई : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माणदेशी भागातील महिला शेतकऱ्यांची वैविध्य आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने तसेच ग्रामीण संस्कृतीने नटलेला माणदेशी महोत्सव येत्या गुरुवारपासून (ता. ४) मुंबईत होणार आहे. यंदा ४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत हा महोत्सव येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे.  दुष्काळी भागातील महिला सक्षमीकरण आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने याचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहेत. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे.  या महोत्सवात माणदेशाचे वैशिष्ट्य असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. यावर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचे, खर्डा, ठेचा, शेव-पापड आदी विविध बाबी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्सदेखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांनादेखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार होय. ग्रामीण संस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचादेखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. माण तालुक्यातील गाझी लोकनृत्य, तसेच एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com