जालन्याचे केशर आंबा निर्यात केंद्र बाजार समितीकडे

जालन्याचे केशर आंबा निर्यात केंद्र बाजार समितीकडे
जालन्याचे केशर आंबा निर्यात केंद्र बाजार समितीकडे

जालना : दोन वर्षांपासून आंब्याविना बंद असलेल्या या केशर आंबा निर्यात केंद्राला अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर उभारलेले आंबा निर्यात केंद्र चालविण्याची तयारी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने दाखवत तसा प्रस्तावही पणनकडे सादर केला होता.

मराठवाड्यातील केशर आंबा निर्यातीची सोय व्हावी, म्हणून जालन्यात आंबा निर्यात केंद्राची मागणी पुढे आली. या मागणीला प्रतिसाद देत 2004-05 मध्ये पणन मंडळाने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने नाममात्र दराने दिलेल्या जवळपास साडेतीन एकर जागेवर "केशर आंबा निर्यात केंद्र' उभे केले. त्यासाठी लागणारे पॅक हाउस, रायपनिंग चेंबर आदी उभे केले. कार्यान्वित होताच आंब्याच्या मोठ्या प्रमाणात होत असलेले उत्पादन व इरॅडिशन ट्रीटमेंटची सोय यामुळे 2006 मध्ये पहिल्यांदा या निर्यात केंद्रावरून प्रक्रियेसाठी आलेल्या 49 टन केशर आंब्यापैकी 28 टन आंबा अमेरिकेत एक्‍स्पोर्ट केला गेला.

सुरवातीला तीन वर्षे बऱ्यापैकी विदेशांत आंबा निर्यात झालेल्या केंद्रावरून आंबा निर्यातीचे प्रमाण सातत्याने कमी होत गेले. 2015 व 2016 मध्ये तर या केंद्रावरची निर्यात आंब्याविना पूर्णत: ठप्प झाली. या निर्यात केंद्राचा आंब्यासह द्राक्ष व इतर फळबाग, भाजीपाला आदी उत्पादक शेतकऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून जालना बाजार समितीने 18 डिसेंबर 2016 ला झालेल्या बाजार समितीच्या बैठकीत जालन्याचे केशर आंबा निर्यात केंद्र बाजार समितीने चालविण्यास घेण्याचा ठराव घेतला. त्या ठरावाला अनुसरून बाजार समितीने प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविला होता. या संदर्भात हस्तांतरासाठी झालेल्या प्रक्रियेनुसार जालना बाजार समितीने टाकलेल्या प्रस्तावाला पणनकडून मान्यता देण्यात आली असून, आता जालन्याचे निर्यात केंद्र आता जालना बाजार समितीच्या ताब्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी दिली.

2008 मध्ये सर्वांत जास्त निर्यात निर्माण झाल्यापासून आजतागायत जालन्याच्या आंबा निर्यात केंद्रावरून जवळपास 188 टन आंब्याची निर्यात झाली होती. त्यामध्ये 2008 मध्ये जालन्याच्या निर्यात केंद्रावरून सर्वाधिक 46 टन आंब्याची निर्यात झाली. गत दोन वर्षांपासून निर्यात ठप्प आहे.

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या टेंभूर्णी येथे काही दिवसांपूर्वी आंबा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक होऊन त्यांनी यंदा आंबा निर्यातीचा संकल्प केला होता. त्या संकल्पकर्त्या शेतकऱ्यांना निर्यात केंद्र त्यांच्या निर्यातीपूर्वी बाजार समितीने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्यास मोठा आधार मिळणार असल्याचे केशर आंबा उत्पादक शेतकरी संजय मोरे पाटील यांनी स्पष्ट केले.

निर्यात केंद्र शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल असा आमचा प्रयत्न राहील. केवळ आंबाच नाही, तर द्राक्ष व इतरही वस्तू निर्यातीसाठी त्याचा उपयोग व्हावा यासाठी केंद्रामध्ये आवश्‍यक ते बदल करण्यासाठी पावले उचलले जातील. - गणेश चौगुले , सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com