शेतकऱ्यांनी स्वतः आॅनलाइन नोंदणी करावी

‘शेतीबाबतच्या शासकीय योजना’ या विषयावर मार्गदर्शन करताना मनोज वेताळ.
‘शेतीबाबतच्या शासकीय योजना’ या विषयावर मार्गदर्शन करताना मनोज वेताळ.

सांगली ः बदलत्या परिस्थितीनुसार शासनाने कृषी विभागाच्या योजनेत बदल केला आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी कृषी विभागाशी सातत्याने संपर्कात राहावे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी केले. सांगली येथे ॲग्रोवनच्या प्रदर्शनात शनिवारी (ता. ६) दुसऱ्या सत्रातील व्याख्यानातील शेतीबाबतच्या शासकीय योजनांची माहिती देताना ते बोलत होते. वेताळ म्हणाले, की शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतकरी कृषी विभागाच्या योजना घेण्यासाठी रस दाखवत नाहीत. त्याची प्रक्रिया किचकट असल्याचा समज शेतकऱ्यांमध्ये झाला आहे. पण योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी मित्रांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे फळबाग लागवड, रोजगार हमीमधून फळबाग लागवड, ठिबक, तुषार सिंचन यासह विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्या आहेत. ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान हे पीक पद्धतीनुसार ठरवली आहे. पिकाच्या अंतरानुसार अनुदानाच्या टप्प्यांची आखणी शासनाने केली आहे.  ‘‘कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेताना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. अर्ज करताना बचत खात्याचा अकरा अंकी नंबर, भ्रमणध्वनी महत्त्वाचा आहे. अर्ज स्वतः केला तर आपला अर्ज कुठपर्यंत भरला आहे, कोणत्या कागदपत्रांची कमी आहे याची माहिती मिळते. शासनाने उन्नत शेती समृद्ध शेती या योजनेत कृषी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. शासन पैसे देऊन उपाय देत आहे. पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहे. गावात ग्रामसभेला शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखविली पाहिजे. यामध्ये जॉब कार्ड काढावे. त्यानंतर गावात कृषी विभागाच्या योजनेत आपण सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.  मार्गदर्शनातील ठळक मुद्दे

  • फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. तालुका कृषी कार्यालयाशी सातत्याने संपर्क हवा.
  • अवजारे खरेदीसाठी विद्यापीठाचा तपासणीचा दाखला पाहावा.
  • कृषीच्या योजनेची माहिती ग्रामसभेत मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांची ग्रामसभेला उपस्थिती.
  • ठिबकसाठी अल्पभूधाक शेतकऱ्यांसाठी ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान.
  • मागेल त्याला शेततळे अर्ज करण्यासाठी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार या पोर्टलचा वापर करा.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com