मराठवाड्यात बंदला मोठा प्रतिसाद

मराठवाड्यामध्ये कडकडीत बंद
मराठवाड्यामध्ये कडकडीत बंद

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९) पुकारण्यात आलेला बंद मराठवाड्यात कडकडीत पाळण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर एरवी वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर एखादे वाहनच धावताना दिसत होते. दिवसभर शहरांसह ग्रामीण भागांत ठिकठिकाणी रस्त्यांवर ठिय्या मांडून मराठा समाजबांधवांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी व भजन करण्याचा मार्ग अवलंबला होता. बाजारपेठांच्या गावांमध्ये बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला.

औरंगाबाद येथे बुधवारी (ता. ८) झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत क्रांती दिनाचे आंदोलन अहिंसक, असहकार पद्धतीने करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले होते. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. शिवाय, बंद न करण्याचा निर्णय घेतलेल्या जिल्ह्यांना यातून मुभा दिली होती.

बुधवारी झालेल्या राज्यव्यापी बैठकीनंतर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होणारा महाराष्ट्र बंद, आंदोलना दरम्यानचे गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, गुन्हे मागे न घेतल्यास १५ ऑगस्टपासून चुलबंद आंदोलन; तालुका - जिल्हा स्तरावर १० ऑगस्टपासून साखळी उपोषण, आत्महत्या रोखण्यासाठी १० ते १२ संवाद यात्रा आदी भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासूनच बंदसाठी मोठा प्रतिसाद मिळण्याचे चित्र दिसून आले. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आदी सर्वच जिल्ह्यांत विविध ठिकाणी दिवसभर रास्ता रोको, ठिय्या, धरणे, मुंडण, सरकारविरोधी घोषणाबाजी आदी सुरू होते.

औरंगाबादसह जालना व इतर ठिकाणचे उद्योग, बाजारपेठा, आठवडी बाजार, राज्य परिवहन मंडळाची सेवा, शाळा, महाविद्यालये बंद होती. औरंगाबाद, शहरातील बहुतांश रस्ते अडविण्यात आले होते. ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदमुळे क्रांतिदिनी अत्यावश्‍यक सेवा वगळता सारे काही ठप्प पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९) पुकारण्यात आलेल्या बंदचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला. तीन गाड्या रद्द करण्यात आल्या, तर चार गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com