महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण

महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण
महाराष्ट्र बंदला काही भागात हिंसक वळण

पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरात काही भागात १०० टक्के, तर काही भागात संमिश्र प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले.   

औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की

काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की केली. तसेच त्यांना या परिसरातून हाकलून लावण्यात आले. याशिवाय शहरासह जिल्ह्यात आंदोलन पेटल्याने सकाळपासून औरंगाबादेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तर आक्रमक झालेले आंदोलक रस्त्यावर असून, शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बाजारपेठा बंद आहेत. औरंगाबाद शहरातील प्रमुख बाजारपेठाही बंदच आहेत.  

औरंगाबादेत दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न 

मराठा आरक्षणावरून देवगाव रंगारी येथे सुरू असलेल्या आंदोलनात तहसील प्रशासन दीड तास निवेदन स्वीकारायला आले नाही. म्हणून जयेश द्वारकदास सोनवणे या तीस वर्षीय युवकाने पुलावरून वेळगंगा नदीत उडी मारली. त्याच्या पायाला जबर मार लागला आहे तर जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे या पन्नास वर्षीय व्यक्तीने विषप्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

कायगावात आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार

कायगाव येथे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांवर प्रतिहल्ला करत अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग लावली.

जालन्यात बससेवेवर परिणाम 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (ता.24) सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा येथून विराट मोर्चाला सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार, खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यातील दोन आगारांची बससेवा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. तर जालना आगाराची बससेवा काही प्रमाणात सुरू असल्याचे विभागीय नियंत्रक यू. बी. वावरे यांनी 'सकाळी'शी बोलताना सांगितले. तसेच पोलिसांच्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यातील अंबड, परतूर या दोन आगाराची बससेवा थांबविण्यात आली आहे. तर जालना आगारातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत.

परभणीत कडकडीत बंद 

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मंगळवारी (ता.24) परभणी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला. वाहतूक व दळणवळणापासून उपहागृहापर्यंत सर्व व्यवस्था ठप्प असताना सकाळी पाऊणे अकरा वाजता परभणीत रेलरोकोही करण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

लातूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.२४) सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातील नागरिक एकत्रित आले. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर हातात भगवा पताका घेऊन घोषणा देत राष्ट्रीय महामार्गावर अकरा वाजता रास्ता रोको आंदोलनाला सुरवात केली. 

नांदेडमध्ये बससेवा ठप्प

मराठा संघटनांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेवर नांदेड जिल्ह्यातील सर्वच नऊ आगारातील एसटी बस सेवा मंगळवार (ता. २४) रोजी पहाटे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहाटेपासून जिल्ह्यातून आज एकही एसटी बस बाहेर पडली नाही. शिवाय सिटी बसदेखील थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रक अविनाश कचरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

बीडमध्ये दोघांना जबर मारहाण

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२४) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, बंदच्या कारणावरुन परळीत दोघांना जबर मारहाण झाली असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. परळीत तणावपूर्ण शांतता असून, कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. खानापूर येथे पोलिसांची जीप जाळली हिंगोली : हिंगोली - कळमनुरी रस्त्यावर आंदोलकांनी बासंबा ( ता . हिंगोली ) पोलिसांची जीप पेट्रोल टाकून पेटवून दिली.

साताऱ्यातील काही बाजारपेठ्यांचे व्यवहार ठप्प 

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर आज मल्हारपेठ या ठिकाणी मल्हारपेठ व्यापारी असोसिएशने संपूर्ण मल्हारपेठ बंदची हाक दिल्याने आज दिवसभर बाजारपेठ बंद राहणार आहे. शाळा, कॉलेज अंगणवाडी, वडाप व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. उद्या सातारा जिल्हा मराठा आरक्षणाने जिल्हा बंदची हाक दिली आहे.

बारामतीत प्रशासकीय भवनावर केली दगडफेक

बारामती शहरात मोर्चानंतर निवेदन देण्यासाठी प्रशासकीय भवनात जमले होते. मराठा बांधव, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर संतप्त तरुणांकडून दगडफेक केली. 

नागपूरात आंदोलकांना घेतले ताब्यात 

नागपूर मध्यवर्ती स्थानकासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात असून, आंदोलकांनी अडवल्या बसेस.

पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी ठिय्या

निरा-बारामती रस्त्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काकासाहेब शिंदे याना श्रध्दांजली वाहण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या निरा-बारामती रोडवरील वाहतूक काही तासांसाठी खोळंबली होती. कार्यकर्त्यांने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 

अहमदनगरमध्ये कडकडीत बंद   महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत आहे. ठिक-ठिकाणी रास्ता रोको मराठा अरक्षणाच्या मुद्यावरुन जामखेड शहरात कडकडीत बंद. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको, नगर-बीड-हैद्राबाद महामार्गावर रास्ता रोको, खर्डा चौक येथे रस्ता रोको आंदोलन सुरू, तर पारनेर तहसीलसमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. श्रीगोंदा शहर बंद, कर्जतलाही उत्स्फूर्त प्रतिसाद, तर नगर शहरात काकासाहेब शिंदे यांना मराठा समाजाच्या वतीने श्रद्धांजली.

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा संघटनेची बैठक सुरू 

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आरक्षण मुद्द्यावर मराठा संघटनांनी जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

साताऱ्यात राष्ट्रीय महामार्ग रोखला

साताऱ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड सुरु आहे. तसेच या पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा मराठा समाजातील आंदोलकांचा इशारा देण्यात आला.

बुलडाण्यात सर्वत्र बंद 

बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षण बंदचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. शहरात मराठा समाजाच्या युवकांनी मोटरसायकल रॅली काढली. व्यापारी प्रतिष्ठान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

मुबंईत उद्या बंद

मराठा समाजाच्या वतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उद्या (ता.25) बंद पुकारण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com