मराठवाड्यात ४३९२ एकरांवर तुतीची लागवड

मराठवाड्यात ४३९२ एकरांवर तुतीची लागवड
मराठवाड्यात ४३९२ एकरांवर तुतीची लागवड

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा आजपर्यंत ४ हजार ३९२ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. यंदा तुती लागवडीसाठी मराठवाड्याला ३७०० एकरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पावसाचा खंड असूनही मराठवाड्याने तुती लागवडीसाठी मिळालेले उद्दिष्ट पार केले आहे. यावरून रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारा वाटत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

महारेशीम अभियानातून केलेल्या प्रयत्नांचीही त्याला जोड मिळाली आहे. आजपर्यंतच्या एकूणच लागवडीत औरंगाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ११२१ एकरवर तुतीची लागवड झाली असून, त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८३३ एकर, जालना जिल्ह्यात ७०१ एकर, उस्मानाबाद जिल्ह्यात ४५१ एकर, लातूर जिल्ह्यात ४४२ एकर, हिंगोली जिल्ह्यात ३८८ एकर, नांदेड जिल्ह्यात २५१ एकर तर परभणी जिल्ह्यात २०५ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. आणखी किमान दोन हजार एकरवर तुतीची लागवड होणे अपेक्षित आहे. सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तुतीची लागवड करून उत्पादन घेता येणे शक्‍य आहे.

महारेशीम अभियानाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ११ हजार ८३ एकर क्षेत्राची तुती लागवडीसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी ८१३८ एकर क्षेत्र तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८११५ एकर प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यापैकी ६५४९ एकरवर तुती लागवड करण्याला प्रशासकीय मंजुरात मिळाली. त्यापैकी सुरवातीच्या टप्प्यात ३८४० एकरवर तुती लागवडीला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्या तुलनेत १ ऑगस्ट अखेरपर्यंत ४३९२.७५ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली. यामध्ये मनरेगांतर्गत लागवड झालेल्या ४०३४ एकरसह मनरेगा व्यतिरिक्‍त लागवड झालेल्या ३५८.२५ एकरचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पावसाच्या खंडाने घातला खोडा

मराठवाड्यातील तुती लागवडीत पावसाने खोडा घातला आहे. शिवाय सोनपेठ, पालम, उमरगा व देगलूर या चार तालुक्‍यांत अजून तुती लागवड झाली नाही. औरंगाबादमधील पैठण, गंगापूर, वैजापूर आदी तालुक्‍यांमधील तुती लागवडीलाही ब्रेक लागला आहे.

जवळपास अडीच कोटी रोपांची लागवड आठही जिल्ह्यात सुमारे अडीच कोटी रोपांची लागवड केली आहे. यामध्ये औरंगाबाद ६१ लाख ६५ हजार ५००, जालना ३८ लाख ५५ हजार ५००, बीड ४५ लाख ८१ हजार ५००, उस्मानाबाद २४ लाख ८० हजार ५००, लातूर २४ लाख ३१ हजार, परभणी ११ लाख २७ हजार ५००, हिंगोली २१ लाख ३४ हजार, तर नांदेड जिल्ह्यात झालेल्या १३ लाख ८४ हजार ६२५ तुती रोपांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांचे रेशीम उत्पादन वाढविण्यासोबतच उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न राहील. तूर्त शेतकऱ्यांना रेशीम हा एकमेव पर्याय उत्पन्न दुप्पट करण्यास हातभार लावणारा ठरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट झाले आहेत. - दिलीप हाके, सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद, मराठवाडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com