मराठवाड्यातील कपाशी कीड-रोगांचा चक्रव्यूहात

कपाशीवर ढगाळ, दमट वातावरणामुळे विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाला. आधीच पीक कुपोषित त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याअखेर मराठवाड्यातील बहुतांश भागात अचानक पडलेल्या व दोन दिवसांत उघडलेल्या पावसामुळे कपाशीला लागलेली पाते, फुले, बोंडे गळून पडली.
मराठवाड्यातील कपाशी कीड-रोगांचा चक्रव्यूहात
मराठवाड्यातील कपाशी कीड-रोगांचा चक्रव्यूहात

औरंगाबाद : मराठवाडा कपाशीचे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा मात्र या आगाराला आधी पावसाचा मोठा खंड आणि नंतर अनेक कीड- रोगांसह आकस्मिक मर रोगाने ग्रासले आहे. काही भागात कीड-रोगांचे प्रमाण वाढले असून, यावर नियंत्रण मिळविताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. आधीच संकटांच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी उत्पादनात ४० ते ५० टक्‍के घटीचा अंदाज आहे.     मराठवाड्यात यंदा खरिपात सरासरी १७ लाख १७ हजार ४५१ हेक्‍टरवर कपाशी लागवड होईल, असे कृषी विभागाने सांगितले होते. परंतु यंदा सरासरीच्या ९१ टक्‍के क्षेत्रावरच अर्थात १५ लाख ६४ हजार ९४ हेक्‍टरवरच कपाशीची लागवड झाली. हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने उपलब्ध पाण्यावर काही शेतकऱ्यांनी मेअखेरपर्यंत कपाशीची लागवड केली. तर बहुतांश शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसावर लागवड केली होती. परंतु मराठवाड्यात काही ठिकाणी १५ जूनपासून, तर काही ठिकाणी २५ जूनपासून हलका तुरळक वगळता पाऊसच झाला नाही. ऐन वाढीच्या काळातच पाऊस नसल्याने कपाशीची वाढ खुंटली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत पावसाने हजेरीच लावली नाही. 

ज्या शेतकऱ्यांकडे थोडीबहुत सिंचनाची सोय होती त्यांच्या कपाशीवर ढगाळ, दमट वातावरणामुळे विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाला. आधीच पीक कुपोषित त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याअखेर मराठवाड्यातील बहुतांश भागात अचानक पडलेल्या व दोन दिवसांत उघडलेल्या पावसामुळे कपाशीला लागलेली पाते, फुले, बोंडे गळून पडली. त्यानंतर पुन्हा आलेल्या जोरदार पावसामुळे कपाशीत ‘आकस्मिक मर’सह, रस शोषण करणाऱ्या किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील जवळपास २० ते २५ टक्‍के क्षेत्रावरील कपाशीच्या पिकात रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानाची पातळी गाठली आहे. तर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे भारी जमिनीतील कपाशीच्या आकस्मिक मरचे प्रमाण ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आढळून आले आहे. पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, मावा यांचे प्रमाण १ ते ५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड, प्रतिकूल हवामान, अन्नद्रव्यांची कमतरता, पाऊस झाल्यानंतरच्या काळात झाडांमध्ये अन्नद्रव्य ओढण्याची क्षमता नसणे, रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आदी समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. पंचवीस ते ३० टक्‍के क्षेत्रावर लाल्या विकृतीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत हे प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी व तज्ज्ञांनी सांगितले.  शिफारसीनुसार कृषी विद्यापीठातील पीक संरक्षण विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले आहे.  मराठवाड्यातील कपाशी लागवडीची स्थिती (हेक्‍टरमध्ये) जिल्हा...........सरासरी क्षेत्र ...............प्रत्यक्ष लागवड औरंगाबाद........३८७३५४................३९५१०७ जालना............२९७९९२..................२७८८७० बीड................३२९३२१.................३६१६५५ लातूर...............४५८६...................४८९२ उस्मानाबाद........२४६३२................२२६९२ नांदेड..............३२३७५४................२६९७७९ परभणी.............२५७१९९................१७६४९४ हिंगोली.............९२६१३.................५४६०५ कपाशीवर आढळलेले कीड-रोग फूलकीडे, तुडतुडे, पांढरी माशी, मावा, पिठ्या ढेकूण, लाल्या(विकृती), आकस्मिक मर उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपर्यंत घट यंदा कृषी विभागाने औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांसह मराठवाड्यात सर्वदूर हेक्‍टरी सरासरी १४ क्‍विंटल ८८ किलो कपाशीची उत्पादकता प्रस्तावित केली होती. या तीनही जिल्ह्यांत २०१५-१६ मध्ये कपाशीच्या उत्पादकतेत सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत ६५ टक्‍के घट आली होती. तर २०१६-१७ मध्ये कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या उत्पादकतेच्या तुलनेत जवळपास २५ टक्‍के घट आलीच होती. यंदा मात्र पुन्हा ढगाळ, दमट वातावरणामुळे विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकतेत ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.  शेतकऱ्यांनी किडींच्या आर्थिक नुकसानाची पातळी पाहून कीटकनाशकांच्या शिफारशीप्रमाणे फवारण्या घ्याव्यात. एकापेक्षा जास्त कीटकनाशके मिळून फवारणी करू नये. चिकट सापळे, निंबोळी अर्काच्या फवारणीचा उपयोग करावा.  - डॉ. एस. बी. पवार, विस्तार कृषी विद्यावेत्ता, ‘वनामकृवी’ परभणी.  कुपोषित कपाशीवर रसशोषक किडींच्या प्रादुर्भावासोबतच लाल्याचा प्रादुर्भाव आहे. कोरडवाहू कपाशी आधीच संपल्यात जमा आहे. शासनाने मंडळ, गावस्तरावर नुकसानाची पाहणी करायला हवी. - निवृत्ती घुले, शेतकरी, वखारी, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com