पीकविमा प्रस्तावात मराठवाडा आघाडीवर

पीकविमा प्रस्तावात मराठवाडा आघाडीवर
पीकविमा प्रस्तावात मराठवाडा आघाडीवर

औरंगाबाद : पिकाला विमा कवच मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सातत्याने पुढाकार घेणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपातही पिकांना विमा कवच मिळविण्यात आघाडी घेतली आहे. मंगळवारी (ता. ३१) जुलैच्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून तब्बल ५७ लाख ९८ हजार ३०० वर विमा प्रस्ताव दाखल करण्यात आले. यामध्ये बीड जिल्ह्यातून सर्वाधिक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आले असून नांदेड, उस्मानाबाद, जालना त्यानंतर अनुक्रमे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गतवर्षीच्या खरीप हंगामात जवळपास ५३ लाख ७० हजारवर पीक विमा प्रस्ताव दाखल झाले होते. यंदा सुरवातीपासूनच ऑनलाइन विमा प्रस्ताव स्वीकारण्याला लागलेले ग्रहण लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा उतरविता येईल की नाही, याविषयी शंका व्यक्‍त होत होती. शासनाने बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा उतरविण्यासाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविली असली तरी आवश्‍यक ऑनलाइन तत्पर सुविधा तातडीने मिळत नसल्याने २५ जुलैपर्यंत केवळ २७ लाखांवरच विमा प्रस्ताव दाखल करणे शक्‍य झाले होते. त्यानंतर मात्र पिकाचा विमा उतरविण्याला प्रचंड गती मिळाली. त्यामुळे ३१ जुलैच्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील दाखल पीकविमा प्रस्तावाचा आकडा ५७ लाख ९८ हजारावर पोहाेचला.

मराठवाड्यातील बीड, नांदेड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, परभणी व हिंगोली या सातही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आपल्या पिकाचा विमा उतरविण्यात आघाडी घेतली असली तरी लातूर जिल्हा मात्र सर्वात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवार सकाळपर्यंत ९७ हजार ७८६ पीकविमा प्रस्तावच दाखल झाले होते.

मंगळवारी सकाळपर्यंत कोकण विभागात २९ हजार ६००, नाशिक विभागात २४ हजार ४४८, पुणे विभागात ४ लाख ६४ हजार १४७, कोल्हापूर विभागात १८ हजार ९३, अमरावती विभागात ८ लाख ६ हजार १३४ तर नागपूर विभागात ५२ हजार ८६४ पीकविमा प्रस्ताव दाखल झाले होते. संपूर्ण राज्यात मंगळवारी सकाळपर्यंत ७१ लाख ९३ हजार ६३४ पीकविमा प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पीकविमा प्रस्ताव
बीड १३ लाख ६२ हजार ५८८
नांदेड ११ लाख २१ हजार ३५७
उस्मानाबाद ९ लाख ८७ हजार ९९२
जालना ९ लाख २९ हजार ७३६
औरंगाबाद ५ लाख ४२ हजार ३८५
परभणी ५ लाख २० हजार ३४१
हिंगोली २ लाख ३६ हजार १२४
लातूर ९७ हजार ७८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com