मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून चालणार नाही : पुरंदरे

मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून चालणार नाही : पुरंदरे
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून चालणार नाही : पुरंदरे

परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी नव्हे, तर मराठवाड्यातील सर्व अन्यायग्रस्त प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील समदुःखी शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यावर फक्त बोलून चालणार नाही, तर संघटित होऊन लढा द्यावा लागणार आहे. आमदार- खासदारांवर दबाव टाकावा लागणार आहे. पाणी ही मोठी सत्ता आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे राजकारण करावे लागेल, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील जल भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी)तील माजी प्राध्यापक तथा जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केले. अखिल भारतीय किसान सभेतर्फे पोखर्णी नृसिंह (जि. परभणी) येथे शनिवारी (ता. २३) दुष्काळ निवारण व पाणी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे परभणी जिल्हा अध्यक्ष काॅम्रेड विलास बाबर अध्यक्षस्थानी होते. खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ पंडित वासरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे, लिंबाजी कचरे, सरपंच आत्माराम वाघ, प्रगतिशील शेतकरी एकनाथराव साळवे, मदनराव वाघ आदी उपस्थित होते. प्रा. पुरंदरे पुढे म्हणाले, की देशात ६५ टीएमसी पाण्याची उपलब्धता असूनही सिंचनासाठीच्या पाणी व्यवस्थापनात इस्राईल जगाचे नेतृत्व करत आहे. जायकवाडीमध्ये ७६ टीएमसी पाणी उपलब्ध होते. जायकवाडीच्या कालव्यासह वितरण प्रणालीची दुरवस्था झाल्याने पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे, त्यामुळे पाणी आवर्तनाचा कालावधी वाढला आहे. दोन आवर्तनांमधील अंतर वाढते. प्रकल्पाच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले जात नाही. पाणी वापर संस्था स्थापन करून प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जायकवाडीच्या वरचे बहुतांश प्रकल्प आठमाही आहेत; परंतु वरच्या भागातील लोक जायकवाडीच्या हिश्श्याचे पाणी वापरतात. पाणी हे कुणा एकाच्या मालकीचे नाही, ते सर्वांच्या मालकीचे आहे. नदी खोऱ्यातील पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. परंतु हक्काच्या पाण्यासाठी आंदोलने करावी लागतात, तेव्हा कुठे उपकार केल्यासारखे पाणी सोडले जाते.  गोदवरी नदी खोरे हे तुटीचे खोरे आहे. गोदावरी पाणीवाटप लवादाने मराठवाड्यावर अन्याय केला आहे. क्षेत्राच्या प्रमाणात पाणी मिळत नाही, त्यामुळे जायकवाडी तसेच नांदुर मध्यमेश्वर, येलदरी-सिद्धेश्‍वर, कृष्णा मराठवाडा आदी प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पावसाचे आणि भूगर्भातील पाणी योग्य पद्धतीने वापरावे. प्रा. वासरे यांनी जमीन सुपीकतेसाठी मृद जलसंधारण, पिकांचा फेरपालट, पिकांची पाण्याची गरज याबाबत माहिती दिली. बाबर यांनी हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ आहे, एप्रिल महिन्यात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे सांगितले. पाणी हक्क परिषदेतील प्रमुख मागण्या

  •  नवीन जलआराखड्यानुसार पाटबंधारे मंडळ बरखास्त करून नदी खोरे अभिकरण स्थापन करावे.
  •  अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या कामास गती देऊन तत्काळ पूर्ण करावे.
  •  जुन्या प्रकल्पांचे पुरुज्जीवन करण्यात यावे.
  •  उपसा सिंचन योजनांना कायदा लागू करावा.
  •  दुष्काळी स्थितीत जनावरांचा सांभाळ करण्यासाठी एप्रिल महिन्यात जायकवाडीतून पाणी आवर्तन सोडण्यात यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com