मराठवाड्यातील मोसंबी पुन्हा संकटाच्या फेऱ्यात

मराठवाड्यातील मोसंबी पुन्हा संकटाच्या फेऱ्यात
मराठवाड्यातील मोसंबी पुन्हा संकटाच्या फेऱ्यात

औरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबी फळबागांच्या बहराच्या नियोजनात वातावरण बदलाने खोडा घातला आहे. आंबिया बहर घेण्यात वातावरण बदलाचा अडथळा निर्माण होत असून, मोसंबीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, करपा आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकीकडे मृग बहरातून म्हणावे तसे उत्पादन हाती आले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आंबिया बहरावर होत्या. मात्र बहर फुटीवरच कीड-रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत.  मराठवाड्यात जवळपास ४८ हजार हेक्‍टरवर मोसंबीचे क्षेत्र विस्तारले आहे. सर्वाधिक क्षेत्र जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आहे. मोसंबीला जीआयचे मानांकन मिळाल्याने मोसंबीची गोडी वाढली आहे. मराठवाड्यातील जवळपास ७० टक्‍के शेतकरी आंबिया बहर घेतात, तर ३० टक्‍के शेतकरी मृग बहराचे नियोजन करतात. गेल्या हंगामात मोसंबी बागायतदारांना नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसला. दिवाळीनंतर मालाची कमतरता जाणवू लागली, तसतसा मोसंबीचा बाजार वधारले. मात्र या दरवाढीचा पाच ते दहा टक्‍केच मोसंबी उत्पादकांना फायदा झाला. त्यातच मृग बहराच्या नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आल्याचे चित्र आहे. 

अचानक पाऊस, पावसाचा प्रदीर्घ खंड यामुळे शेतकऱ्यांचे मृग बहराचे नियोजन कोलमडले. त्यातच वातावरणातील इतर बदलांचाही नियोजनवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अपेक्षेच्या तुलनेत यंदा मृग बहराचे दहा ते वीस टक्‍केच उत्पादन होईल, अशी आशा असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मोसंबीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, करपा आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला. कीड-रोगांचे नियंत्रण करताना उत्पादनखर्चातही वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया... यंदा जवळपास दोन एकर मोसंबीवर मृग बहराचं नियोजन होतं; पण गुंडी आलीच नाही. आंबिया बहर जसा हातचा, तसं मृग बहराचं नाही. यंदा मृग बहरासाठीची मेहनत फुकट गेली. थंडी, दव, गरमी असं बदलणारं वातावरणं किडींना पोषक ठरतंय.  - ब्रद्रिनाथ पाचोडे, मोसंबी उत्पादक, पाचलगाव, जि. औरंगाबाद 

नवीन बहरासाठीच्या आगारीवर मावा पडलाय. मृग बहराचं उत्पादन पाच ते दहा टक्‍केच होईल. माल नसल्यानं दर तेजीत राहील, पण शेतकऱ्यांना माल नसल्यानं फायदा होईल असं वाटत नाही.  - रुस्तुम घनवट, मोसंबी उत्पादक, पांगरा, जि. औरंगाबाद 

ज्या बागा आंबिया बहरासाठी ताणावर होत्या, त्यांचा पावसामुळे ताण तुटल्याने अशा बागांना फुलोरा येण्याऐवजी नवती आली. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे मृग बहरावर कोळी किडीचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी रसशोषण केल्याने फळाची प्रत खालावली. त्यासाठी शेतकऱ्यांनी डायकोफॉल किंवा गंधक २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास त्यावर प्रतिबंध आणता येतो.  - डॉ. संजय पाटील, शास्त्रज्ञ फळसंशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com