पाणीसाठा घटल्याने मराठवाड्यासमोर चिंतेचे ढग

पाणीसाठा घटल्याने मराठवाड्यासमोर चिंतेचे ढग
पाणीसाठा घटल्याने मराठवाड्यासमोर चिंतेचे ढग

औरंगाबाद : पावसाळ्यातच पाऊस पडत नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट नोंदली गेली आहे. ती गेल्या आठवड्याच्या तुलनेत किंचित असली तरी त्यामुळे मराठवाड्याच्या चिंतेत भर पडली आहे.

मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ १९.५५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यात २२.८६ टक्‍के असलेला ११ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा २१.९७ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्वर, सिनाकोळेगाव या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. मध्यम प्रकल्पांची स्थितीही अवघड आहे. ७५ मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यात तो १५.३४ टक्‍के इतका होता. गेल्या आठवड्यात १२.५६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असलेल्या ७४६ लघू प्रकल्पांमध्ये केवळ १२.२७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ३३.४० टक्‍क्‍यांवरून घटून ३३.२४ टक्‍क्‍यांवर आला आहे. दुसरीकडे तेरणा मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमधील पाणीसाठाही २८.६० टक्‍क्‍यांवरून २७.६० टक्‍क्‍यांवर आला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात सुरू असलेले पाण्याचे टॅंकर व कायम असलेले पाणीपुरवठ्यासाठीचे विहीरींचे अधिग्रहण भूजल स्थितीही स्पष्ट करण्यास पुरेसे आहे.

३५ मध्यम प्रकल्पांची स्थिती अवघड

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ३५ मध्यम प्रकल्पांची स्थिती उपयुक्‍त पाणीसाठ्याबाबत अवघड बनली आहे. या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालना जिल्ह्यातील २, बीड जिल्ह्यातील ९, लातूर जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५, नांदेडमधील २ व परभणी जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

२९८ लघू प्रकल्पांत ५ टक्‍क्‍यांच्या आत उपयुक्‍त पाणीसाठा

मराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांपैकी तब्बल २९८ लघू प्रकल्पांमध्ये ५ टक्‍क्‍यांच्या आतच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तेरा प्रकल्पांत ५ टक्‍के, परभणीमधील २२ प्रकल्पातही ५ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पात ३ टक्‍के तर जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात १० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com