झेंडूच्या दरात मोठी घसरण

झेंडूच्या दरात मोठी घसरण

कोल्हापूर : दिवाळीच्या दरम्यान उच्चांकी असलेल्या झेंडूचे दर गेल्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. दिवाळीच्या दरम्यान सातत्याने शंभर रुपये किलोच्या आसपास असणारे दर आता दहा ते पंधरा रुपयांवर येवून ठेपले आहेत.

सध्या मुंबई शहरात फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनामुळे फेरीवाल्यांकडील फूल विक्री बंद आहे. याचा प्रतिकूल परिणाम मुंबईत किरकोळ प्रमाणात होणाऱ्या फुलांच्या विक्रीवर झाला आहे. यामुळे फूलबाजारातून होणारी सुमारे तीस टक्क्‍यांहून अधिक विक्री ठप्प झाली आहे.

साहजिकच ‘फार फुले पाठवू नका’ अशा सूचना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून देण्यात येत असल्याने राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना दररोज लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

कोल्हापूर, सांगलीसह सातारा, पुणे, संगमनेर, नाशिक, बीड, सोलापूर, पंढरपूर आदींसह मध्य प्रदेशातील उज्जैन, कर्नाटकातील बंगळूर आदी भागांतूनही फुलांची आवक फूलबाजारात होते. अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे यंदा झेंडू फुलांच्या बागांचे अपरिमित नुकसान झाले. यामुळे फुलांच्या आवकेत मोठी घट झाली. सणासुदीचे दिवस व फुलांची टंचाई यामुळे यंदा झेंडूचा दर शंभर, क्वचित प्रसंगी दीडशे रुपयांवर राहिला.

दिवाळी झाल्यांनतर दहा ते पंधरा दिवस दर पन्नास रुपयांच्या आसपास होते. परंतु मुंबईत फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याचा फटका फूलबाजाराला बसला. मुंबईत जेवढी विक्री फुलांची होते, त्यौपैकी नियमित ग्राहकांना साठ ते सत्तर टक्के तर फेरीवाल्यांना तीस ते चाळीस टक्के इतकी होते.

आंदोलनामुळे फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद झाल्यानंतर फेरीवाल्यांची फुलांची मागणी एकदम कमी झाली अाहे. सणवारही नसल्याने ही फुले शिल्लक राहू लागली. याचा फटका दर एकदम खाली येण्यावर झाला. अतिरिक्त फुलांची विक्री करायची कुठे? गेल्या काही दिवसांपासून बाजारात झेंडूची आवक वाढत असून, या फुलांची विक्री करायची कोठे हा प्रश्‍न मुंबईतील व्यापाऱ्यांना भेडसावत असल्याने त्यांनी थोड्या थोड्या प्रमाणात फुले पाठवावीत, असे आवाहन करण्यास सुरवात केली आहे. फेरीवाल्यांचा व्यवसाय कधी सुरळीत होईल याचा अंदाज नसल्याने मागणीअभावी झेंडूचे दर सणासुदीच्या काळापर्यंत पडलेलेच राहतील असा अंदाज आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या व नवे प्लॉट करणाऱ्या झेंडू उत्पादकांपुढे ही समस्या उभी राहिली आहे. नवीन उत्पादकांपुढे पेच सरत्या हंगामात फुले नसल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी झेंडू घेण्याविषयी नियोजन केले होते. झेंडू प्लॉट घेण्यासाठी तयारी करीत असतानाच दर पडल्याने व ते कधी सुरळीत होतील याची शाश्‍वती नसल्याने आता नव्याने झेंडूचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे पेच पडला आहे. यामुळे अनेक शेतकरी झेंडू करण्याचे नियोजन बाजूला ठेवत असल्याचे चित्र सध्या फूल उत्पादक पट्ट्यात आहे.

फेरीवाल्यांच्या संपामुळे आमच्याकडील फुलांचा उठाव मंदावला आहे. माल शिल्लक राहत असल्याने दररोज येणाऱ्या फुलांची कशी विक्री करायची, या चिंतेत आम्ही आहोत. दर नसल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. पण क्षमतेपेक्षा जादा फुले आम्ही घेऊ शकत नसल्याने आमचाही नाइलाज आहे. - सचिन लोखंडे, व्यापारी, दादर फूल मार्केट ............. दिवाळीवेळी माझ्या फुलांचा प्लॉट सुरू झाला. पहिल्या तोड्याला ८० रुपये दर मिळाला. पण त्यानंतर दरात वेगाने घसरण होत गेली. आता हा दर १० रुपयांवर आला आहे. व्यापाऱ्यांकडूनही फारशी मागणी नाही. मजूर व व्यवस्थापन खर्चाचा हिशेब केल्यास फुले पाठवून काही रक्कम राहण्याऐवजी पदरमोड करून गाडीभाडे देण्याची वेळ आली आहे. - सचिन कोळी, झेंडू उत्पादक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com