बाजारभाव दबावातच, मोठ्या मालाची समस्या कायम

पोल्ट्री
पोल्ट्री

मोठ्या वजनाच्या मालामुळे महाराष्ट्रातील ब्रॉयलर कोंबड्यांचा बाजारभाव दबावात आहे. अतिरिक्त माल निघून जात नाही, तोपर्यंत बाजार किफायती होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे. शनिवारी नाशिक विभागात ६३ रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. बाजारातील परिस्थितीबाबत नाशिक येथील व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके म्हणाले, की सद्यस्थितीत पावणेतीन ते तीन किलोचे पक्षी बाजारात उपलब्ध आहेत. अनुकूल हवामान, स्वस्त कच्चा माल आणि उचांकी पातळीवरील हॅचिंग एग्ज आणि चिक्सचे भाव हे तीन घटक वजनवाढीला प्रोत्साहित करीत आहेत. साहजिकपणे तीन किलोचा माल सध्या बाजाराची डोकेदुखी बनला आहे. याही घडीला काही सकारात्मक बाबी बाजाराला आधार देत आहेत. त्यात उत्तर भारतातील बाजार बऱ्या स्थितीत आहे आणि नाशिक विभागातील माल तिकडे वळता होत आहे. त्यामुळे चालू आठवड्यात मोठ्या मालाचा दबाव काही अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत बाजारभावात थोडी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनचे सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर म्हणाले, की मार्चअखेरपर्यंत बाजारात लहान मालाचा तुटवडा असतो. आजघडीलासुद्धा लहान मालामध्ये तोटा होताना दिसत नाही. म्हणून अशावेळी उत्पादन खर्च किती येतो, यापेक्षा किफायती उत्पन्न कशात मिळते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. खासकरून नॉन ब्रीडर इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सनी उत्पादन खर्च केंद्रित विचार करण्यापेक्षा बाजारभावकेंद्रित व्यावसायिक धोरण ठेवले पाहिजे. उदा. आज जर लहान मालास मागणी आहे आणि त्यात दोन पैसे मिळत असतील, तर अडीच किलो वजनाचा माल तयार करून तोटा करून घेणे हे व्यावसायिक धोरण नव्हे. आज सव्वा किलोच्या मालाचा उत्पादन खर्च ७६ रु. पर्यंत असला तरी त्यास ८० रु. बाजारभाव मिळतोय आणि अडीच किलोच्या मालाचा उत्पादन खर्च हा ७० च्या आसपास येऊन प्रत्यक्षात बाजारभाव ६५ रु. मिळतोय, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. हॅचिंग एग्जचे भाव आज ३३ रु. असले तरी ते कायमस्वरूपी अशाच पातळीवर राहतील असे नाही. मंदीची सायकल सुरू झाल्यावर हॅचिंग एग्ज उत्पादन खर्चाच्या खाली दीर्घकाळपर्यंत विकावे लागण्याचा इतिहास काही जुना नाही. सारांश, आपल्याकडील साधनसामग्री व पायाभूत बाबींचा विचार करून आपआपले व्यावसायिक धोरण ठरवणे गरजेचे आहे. नेहमीच इतरांना कॉपी करून आपले मॉडेल यशस्वी होईल, याची खात्री देता येत नाही. दरवेळी अडीच व तीन किलोचा माल तयार करून विकणे हे दीर्घकालीन फायद्याचे धोरण नाही. सध्या महाराष्ट्रातील व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये ओपन फार्मर्स, नॉन ब्रीडर इंटिग्रेटर्स आणि ब्रीडर इंटिग्रेटर्स अशा तीन श्रेणी आहेत. या तिन्ही श्रेणीतील उत्पादन खर्च वेगवेगळा असून, त्यात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंतचा फरक पडतोय. इतकेच नाही, तर वेगवेगळ्या कारणांमुळे ब्रॉयलर्स सेलिंग रेटमध्ये दोन ते तीन टक्के तफावत येत आहे. कच्च्या मालाच्या बाबतीत रोखीने माल घेणारे, स्टॉक करणारे आणि मोठ्या व दीर्घकालीन उधारित माल घेणारे असे तीन प्रकार इंटिग्रेटर्समध्ये रूढ आहेत. अशा प्रकारामुळे उत्पादन खर्च आणि सरासरी विक्री दर यांचे प्रमाणीकरण दिवसेंदिवस अवघड होत आहे.  

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६४ प्रतिकिलो नाशिक
अंडी ४५० प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४० प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३३ प्रतिनग मुंबई
मका १३५० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २१७७० प्रतिटन इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com