ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी बैठक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली वाटणी सूत्रानुसार (आरएसएफ) शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची तक्रार आल्यामुळे ऊसदर नियामक मंडळाची सदस्यांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे.

साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांना मंडळाच्या शेतकरी प्रतिनिधींनी भेटून ‘आरएसएफ’बाबत तातडीने बैठक बोलविण्याची एकमुखी मागणी शुक्रवारी केली. राज्याचे मुख्य सचिव हेच मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने त्यांच्यासमोर हा प्रश्न ठेवण्यापूर्वी १६ ऑक्टोबरला प्राथमिक चर्चा करण्याचे आयुक्तांनी सुचविले.

या वेळी मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, भानुदास शिंदे, विठ्ठल पवार, पांडुरंग थोरात, श्री.दरेकर यांनी चर्चेत भाग घेतला. ‘‘आरएसएफ’नुसार पेमेंट काढताना काही कारखान्यांची रक्कम प्रतिटन १२ हजारापर्यंत देखील जाते. त्यामुळे यातील अडचणी समजून घ्याव्या लागतील. त्यामुळे बैठकीला काही सीएंनादेखील बोलवून मंडळ सदस्यांनी सर्व समजावून घेत अंतिम निर्णय घ्यावा,’’ असेही आयुक्तांनी सुचविले.

राज्यातील २९ साखर कारखान्यांकडून अद्यापही २२२ कोटीची ‘एफआरपी’ थकविली आहे. तर २० कारखान्यांनी २०१६-१७ ची ५० कोटी ‘आरएसएफ’ थकविली आहे. आयुक्तांनी २२ कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी मान्यता दिली आहे.

दरम्यान, ‘आरएसएफ’बाबत कोणताही बदल करताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करीत आयुक्तांच्या सूचनेला सदस्यांनी मान्यता दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या सदस्यांनी स्पष्ट केले की, ‘‘राज्यातील काही साखर कारखाने शेतकऱ्यांची लुट करीत असून ‘आरएसएफ’ थकवून कोणत्याही कारखान्यांच्या गाळपाला मान्यता देण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही.’’ आरएसएफ, तोडणी व वाहतूक, उतारा काढण्याची पद्धत, काटामारी या सर्व मुद्द्यांचा पाठपुरावा केला जाईल, असेदेखील सदस्यांनी स्पष्ट केले.

राज्यात १०५ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी पत्रकारांना गाळप हंगामाच्या पूर्वतयारीची माहिती देताना सांगितले, की गाळपासाठी १०० सहकारी व ९० खासगी प्रस्ताव आलेले आहेत. २० ऑक्टोबरपासून आम्ही परवाने देऊ. यंदा ११.५० लाख हेक्टरवर उसाचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, हुमणी, पाणी टंचाई यामुळे उत्पादन घटणार असून कमी उत्पादकतेमुळे १०५ लाख टन साखर यंदा तयार होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या हंगामात ९.०५ लाख हेक्टरवरील उसातून १०७ लाख टन साखर तयार झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com