agriculture news in Marathi, migration for employment in drought, Maharashtra | Agrowon

वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं पडली ओस
विनोद इंगोले
बुधवार, 22 मे 2019

वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते. गावात शिल्लक उरतात केवळ म्हातारी माणसं. शासकीय अनास्थेपायी अशी गावे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्‍यात एक नव्हे तर तब्बल चार-चार आहेत. 

वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते. गावात शिल्लक उरतात केवळ म्हातारी माणसं. शासकीय अनास्थेपायी अशी गावे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्‍यात एक नव्हे तर तब्बल चार-चार आहेत. 

डोंगरकड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोथली, हेटी, किन्हाळा तसेच दानापूर अशी या गावांची नावे आहेत. बोथली आणि हेटी या गावाचा कारभार गटग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो. या दोन्ही गावांची मिळून ११६४ इतकी लोकसंख्या. गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा सुरू होताच या गावातील युवकांवर निर्वासीत होण्याची वेळ येते. सिंचनाच्या सोयी नसल्याच्या परिणामी या भागात कापूस, सोयाबीन यासारख्या कोरडवाहू पिकांचाच आधार शेतकऱ्यांना आहे. परंतु या पिकांचे देखील वन्यप्राण्यांकडून नुकसान होते. परिणामी शेतीतून अपेक्षित उत्पादकतेचा हेतू साध्य होत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले. 

दुग्धव्यवसायातून घडली क्रांती
११६४ लोकसंख्येच्या बोथली व हेटी या गावांमध्ये १८५० इतकी दुधाळ जनावरे आहेत. दूधाच्या विक्रीकरिता देखील संकलन केंद्र किंवा अन्य पर्याय शासनाकडून उपलब्ध करून दिले गेले नाही. त्यामुळे दही, पनीर या सारख्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करून त्याची लगतच्या गावांमध्ये विक्री करण्यावर या गावातील शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. अशाप्रकारे विदर्भात दुग्ध व्यवसायाचे एक मॉडेल साकारले गेले, इतर गावांना प्रेरणा मिळावी याकरिता या गावाला शासनस्तरावरून बळ देणे अपेक्षित होते. परंतु झाले उलटेच !

पाण्याअभावी होते स्थलांतरण
गावशिवारात काळा दगड असल्याने विहीर खोदल्यानंतर त्याला पाणी लागत नाही. सिंचन प्रकल्प किंवा अन्य पर्यायदेखील पाण्याचे नाही. त्यामुळे उन्हाळ्याला सुरवात होताच या गावातील महिला, पुरुषांची सामान बांधण्याची लगबग सुरू होते. तान्हुल्या मुलांचे कपडे, खाण्यापिण्याचे साहित्य आणि जनावरे बांधण्याकामी लागणारे दोर यासह इतर साहित्याचा समावेश राहतो. जानेवारी महिन्यातच या भागातील जलस्त्रोत कोरडे पडतात. माणसालाच पिण्याकरिता पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याची सोय कशाच्या बळावर करणार, याच विवंचनेतून हे गावकरी गाव सोडायला बाध्य होतात. दरवर्षीचा हा नित्यनेम झाला आहे. जानेवारी ते जून अशा चार महिन्यांचा काळात हे गावकरी वऱ्हाडात राहण्यासाठी जातात. एखाद्या शेतकऱ्याला विनवणी करून त्याच्या शेतातच आसरा शोधला जातो. 

गावातील अनेक घरांना कुलपे
गावात केवळ म्हातारी-कोतारी माणसे आणि कुलूपबंद घराचेच अस्तित्व जाणवत होते. समाधान चायरे यांच्या घरात वृद्धदेखील कोणी शिल्लक नसल्याने त्यांना आपल्या मुलाबाळांसह गाव सोडावे लागल्याची माहिती मधुकर चौकोने यांनी दिली. 

सरकारी अनास्थाच कारणीभूत
विदर्भातील शेतीमध्ये असलेले नैराश्‍य दूर करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा सल्ला शासनाकडून दिला जातो. परंतु असा व्यवसाय करणाऱ्यांना मात्र बळ देण्याचे कोणतेच प्रयत्न होत नाही, अशी खंत देवानंद बलवीर व प्रमोद कोरडे यांनी व्यक्‍त केली. जानेवारी ते मे या चार महिन्यांच्या कालावधीत चाऱ्याकरिता चारा छावण्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न जरी शासनस्तरावरून सुटला तरी गावातील स्थलांतरण थांबू शकते. या संदर्भाने केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापासून सर्वच स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. परंतु शासन, प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही, असेही विषन्न मनाने प्रमोद कोरडे सांगत होते. 

दानापूरमधूनही होते स्थलांतरण
बोथली, हेटी प्रमाणेच आर्वी तालुक्‍यातीलच दानापूर देखील शासकीय अनास्थेचा भोग भोगत आहेत. पुरुषोत्तम अवथडे यांची चिमुकली आचल शाळेच्या निमित्ताने घरी आजीसोबत राहत होती. भास्कर रामाजी महाजन, सुनील आसटकर यांच्यासह अनेकांच्या घराला कुलूप लागले होते. विशेष म्हणजे मदर डेअरीने या गावात संकलन केंद्र सुरू केले आहे. परंतु जानेवारीनंतर चारा आणि पाण्याची उपलब्धताच होत नसल्याने या गावातील ग्रामस्थांवर जनावरांसह स्थलांतरणाची वेळ येते. परिणामी या संकलन केंद्राचा दूधपुरवठा ही प्रभावीत होतो, असे सांगण्यात आले. 

आता तर आभाळच फाटलं
चांदणी येथील दादाराव गळहाट (वय ६०) यांच्याकडे तीन एकर शेती. दहा म्हशी आणि दहा गाईंच्या माध्यमातून त्यांनी दूग्धव्यवसाय उभारला. परंतु त्यांनाही आपली जनावर जगविण्यासाठी स्थलांतरण करावे लागले. आंजी येथे त्यांनी  कुटुंबीयांसह तळ ठोकला. पत्नी इंदुबाई (वय ५०), मुलगा अंकुश (वय २१) आणि पंकज (वय १८) अशा चौघांचा कुटूंबात समावेश. सारे कुटूंब जनावरांसाठी घराबाहेर पडले असताना दोन दिवसांपूर्वी गावातील त्यांच्या घराला आग लागली. आगीत १० पोते ढेप, तीन पोते गहू आणि १७ हजार रुपयांची रोकड जळून खाक झाले. खाण्यापिण्यासाठी काही उरल नसल्याने शासनाने नाही पण गावकऱ्यांनी या कुटूंबाला आधार देत त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय केली आहे. गावकऱ्यांकडूनच त्यांना दोन दिसांपासून जेवण येत आहे. आभाळच फाटल तर ठिगळ कुठं कुठं लावणार? असा प्रश्‍न दादाराव गळहाट यांनी बोलताना केला. 

सरकार नाही; पण संस्थेचा आधार
सरकार तर मदतीला आले नाही; परंतु गावासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने पुढाकार घेत जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. दानापूर येथे १८० बाय ४० मीटर आकाराचा गावतलाव आहे. त्यातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. शेताच्या उताराच्या दिशेला रिचार्जवेल (शेततळ्याप्रमाणे) घेण्यात आले आहे. तरोडा, तळेगाव येथे सद्या हे काम सुरू असून १०० रिचार्जवेल करण्याचे प्रस्तावीत असल्याचे संस्थेचे सहायक व्यवस्थापक विनेश काकडे यांनी सांगितले. चारा उपलब्धतेकरिता माधापूर येथे मका, ज्वारी, भुईमूंग लागवडीला संस्थेने प्रोत्साहन दिले. या माध्यमातून पाणी आणि चाऱ्याची सोय होईल, अशी अपेक्षा संस्थेला आहे.

गावात उरतात शाळकरी मुले, म्हातारे आजोबा-आजी
गाव सोडणाऱ्या काहींची मुले शाळेत असतात, काहींच्या परिक्षा असतात त्यामुळे त्यांना सोबत नेता येत नाही. परिणामी घरातील आजी-आजोबांना त्यांच्या देखभालीसाठी ठेवले जाते. त्यामुळे बोथली, हेटी आणि दानापूर गावे उजाड पडलेली दिसतात. रस्त्यावर असतात ती केवळ म्हातारी माणसे. बोथलीच्या शांताबाई चौकोने यांच्याकडे दहा जनावरे. मुलगा आणि सून यांनी गाव सोडल्यानंतर शांताबाई सोबत सातवीत शिकणारी पल्लवी तर आठवीत शिकणारा प्रजल्व हे नातू गावात होते. गुणवंत झांबरे यांचा चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा आणि नर्सरीतील राजश्री नामक चिमुकलीवर आईवडिलांशिवाय राहण्याची वेळ आली होती. पेपर देण्यासाठी घरी राहिलेल्या कांचन मारोतराव घाटोळ हिच्यावरच त्यानंतर घर सांभाळण्याची जबाबदारी आली. कांचनचे आईवडील जानेवारीतच स्थलांतरीत झाले. त्यामुळे परीक्षा झाल्यानंतरही ते तीला घेण्यासाठी आले नाही. घरची जबाबदारी सांभाळ अशा सूचना तीच्या आईवडिलांनी तिला केल्या.

चारा छावण्यांची गरज 
बोथली, हेटी, किन्हाळा, दानापूर या चार गावांमधील दुष्काळ ग्रामस्थांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. लोकसंख्येपेक्षा अधिक जनावरे आणि त्यामाध्यमातून धवलक्रांतीची बीज रोवणारी ही गावं. पण त्याचा सरकारला सोईस्कर विसर पडला. हे चित्र गेल्या अनेक वर्षांतही बदलले नाही आणि सरकारी पातळीवरील अनास्था पाहता यापुढील काळातही बदलण्याची सूतराम शक्‍यता नाही. चारा छावण्यांचा मोठा आधार या गावांना होऊ शकतो, परंतु विदर्भातील एकाही गावात सरकारी चारा छावणी नाही, तर मग येथे कोण पुढाकार घेणार ! 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...