दूध दरवाढीचा फज्जा

शासन निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास; तसेच शब्द फिरवल्यास गणेशोत्सवापूर्वीच पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडेल, याची जाणीव शासनाने ठेवावी. ठरल्यानुसार दर देण्याची जबाबदारी स्वीकारावी. - रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना
दूध दरवाढीचा फज्जा
दूध दरवाढीचा फज्जा

पुणे ः राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २५ रुपये वाढीव दर देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, आज दहा दिवसांचा कालावधी उलटला असूनही राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांकडून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे राज्यात दूध दरवाढीच्या निर्णयाचा फज्जा उडाला आहे.  शासनाने उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे आदेश दूध संघांना दिले. मात्र, अद्याप दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीतील एकही रुपया मिळत नसल्याची बाब अनेक ठिकाणी समोर अाली अाहे. मात्र, शासनाकडूनच अद्याप आमच्याकडे दराविषयी काहीच आलेले नाही, त्यामुळे आम्ही दर देऊ शकत नाही, असे दूध संघांकडून सांगितले जात आहे. तसेच, २० जुलै रोजी शासनाने काढलेल्या परिपत्रकातील त्रुटी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दूध दर कसा द्यायचा, यावरच दुग्धविकास विभाग गोंधळात आहे. खासगी डेअरी चालकांकडूनही दूध उत्पादकांना वाढीव दर कधी देणार याबाबत ठोस सांगितले जात नाही. सोलापूर जिल्ह्यात फॅट, एसएनएफनुसार १७ ते २० रुपयांच्या आतच दर मिळतो आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही दूध संघ शासन आदेशाप्रमाणे दर देत नाहीत. नगर जिल्ह्यात कोठेही २५ रुपये दराने दुधाची खरेदी सुरू झाली नाही. वऱ्हाडात मदर डेअरीकडून गाईच्या दुधाला ३.५ फॅट (८.५ एसएनएफ)साठी २१ रुपये ७० पैसे, तर जळगाव जिल्ह्यातील डेअरी याच फॅटसाठी २५ ते २६ रुपये दर देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खानदेशात गाईच्या दुधाला २१ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र, संघांना शासनाचा आदेश मिळाला असून, उत्पादकांना २५ रुपये दर देत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मराठवाड्यात ३.५ फॅट्‌स व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटरपुढे दर मिळाला नसल्याची माहिती उत्पादकांनी दिली. तर, एक ऑगस्टपासून अंमलबजावणी होणे अपेक्षित असल्याचे दूध संघाच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com