भुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान

भुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान
भुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे ३२ कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.८) हा निर्णय घेण्यात आला.  राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटीचे दरही कोसळले आहेत. त्याचा परिणाम दूध खरेदी दरावर होऊन संघ शेतकऱ्यांना कमी दर देत आहेत. याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात मोफत दूध वाटप आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांना मार्च २०१८ या महिन्यात उत्पा.िदत भुकटीपेक्षा २० टक्के अधिकची दूध भुकटी बनवावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३० दिवसांसाठी केली जाणार आहे. सध्या दररोज सुमारे ३६ लाख लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते. त्यापोटी शासनाकडून सुमारे ३२ कोटी रुपयांचे अनुदान संघांना दिले जाणार आहे. महिनाभरानंतर कृषकाळात दुधाचे अतिरिक्त उत्पादन घटून दूध दर पूर्ववत होतील, असा अंदाज आहे.  मार्च महिन्यात उत्पा.िदत केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान २० टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यानंतर याचा थेट लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने त्यांचेही हित साधले जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. यापूर्वी सन २०१२-१३ या वर्षात राज्य सरकारने दूध भुकटीसाठी अनुदान दिले होते. तेव्हा प्रतिलिटर दोन रुपये अनुदान देण्यात आले होते. भुकटीसाठी प्रतिलिटर दुधाला ३ रुपये २४ पैसे तोटा ३१ मार्चअखेर राज्यात २६,५०६ मेट्रिक टन भुकटीचा साठा शिल्लक आहे. राज्यात महिन्याला सुमारे दहा हजार मेट्रिक टन भुकटी तयार होते. २१ खासगी आणि ७ सहकारी दूध संघ दुधापासून भुकटी तयार करतात. सध्या यापैकी २० संघच प्रत्यक्षात कार्यरत आहेत. भुकटीचे दर पडल्यामुळे दूध खरेदी करून त्यापासून भुकटी बनवण्यासाठी संघांना प्रतिलिटर दुधाला ३ रुपये २४ पैसे इतका तोटा होतो, असे दूध संघांनी राज्य सरकारच्या निदर्शनाला आणले आहे. १०० लिटर दुधापासून साडेआठ किलो भुकटी आणि ४ किलो २०० ग्रॅम लोणी तयार होते. त्यामुळे दूध भुकटी बनवताना लागणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर ३ रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ३३ कोटी रूपये अनुदान देणार राज्यात सध्या निर्माण झालेल्या दूध दराच्या प्रश्‍नावर उपाय म्हणून दूध पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांना दूध रुपांतरणासाठी प्रतिलिटर तीन रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील जवळपास ४४ लाख लिटर दूध पावडरच्या रुपांतरणासाठी ३३ कोटींचे अनुदान सरकार देणार आहे. राज्यातील खासगी १४ आणि सहकारी ६ दूध पावडर प्रकल्पांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. २०१२ मध्ये त्यावेळच्या सरकारने प्रतिलिटर २ रुपयांचे अनुदान दिले होते. आम्ही ते ३ रुपये केले आहे. निश्‍चितच या प्रकल्पांना योग्य ते साह्य मिळताना दूध उत्पादकांना योग्य तो दर देण्याबाबत कार्यवाही होण्यास मदत होणार आहे. पण त्यानंतरही दूध दरासाठी या संस्था दूध उत्पादकांची अडवणूक करणार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.  - महादेव जानकर, मंत्री, पशुसंवर्धन व दुग्ध विकास

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com