सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दर

जिल्हा दूध संघाला आॅगस्ट महिन्यातील तीन, सप्टेंबर महिन्यातील एक अशा तीन पगाराचे अनुदान मिळाले. त्यानंतरचे आॅक्टोबर, नोव्हेंबरचे सहा पगारांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. पण शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, यासाठी संघाने स्वतःचे सव्वातीन कोटी रुपये घालून या पगारी केल्या. - सतीश मुळे, सरव्यवस्थापक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ (दूधपंढरी), सोलापूर
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दर
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दर

सोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५ रुपये दर जाहीर केला. पण सोलापूर जिल्हा दूध संघ, शिवामृत दूध संघ आणि काही खासगी संघ वगळता शेतकऱ्यांना अद्यापही हा दर सरसकट मिळत नसल्याची स्थिती आहे. तांत्रिक अडचणी, शासनाचे अनुदान रखडले आदी कारणे सांगून शेतकऱ्यांची २०-२२ रुपयांवरच बोळवण केली जात आहे. एकीकडे दुष्काळामुळे दूध उत्पादनात घट होत आहे. दुसरीकडे दराची ही अशी स्थिती आहे. त्यामुळे दूध उत्पादकांची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे.      

सोलापूर हा दूध उत्पादनातील आघाडीवरील जिल्ह्यापैकी एक समजला जातो. जिल्ह्यात दोन मोठे सहकारी संघ आणि जवळपास सहा खासगी संघांकडून दूध संकलन होते. त्यात सोलापूर जिल्हा दूध संघ आणि शिवामृत हे दोन्ही संघ ग्रामीण भागाशी चांगली नाळ टिकवून आहेत. त्यांच्या स्पर्धेत आता लोकमंगल, प्रभात, नेचर, तिरुमला, वैष्णवी आणि सोनाईसारखे खासगी संघ उतरले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक संकलन गाईच्या दुधाचे होते. ते प्रतिदिन १२ लाख लिटरपर्यंत आहे. पण दुष्काळाची स्थिती, चारा-पाण्याचा अभावाचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर झाला आहे. विशेष म्हणजे दुधाच्यादृष्टीने सध्या पृष्ठकाळ सुरू आहे. त्यामुळे दुधाचे संकलन वाढणे अपेक्षित आहे. मात्र चारा-पाण्याअभावी एकूण दुधाच्या तुलनेत २० ते २५ हजार लिटरची घट असल्याचे सांगितले जाते. हा आकडा लवकरच वाढण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांची अशीही कोंडी

गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५ रुपये देण्यासाठी दूध संकलन केंद्रांना तांत्रिक अडचणी येत आहेत. अनुदानासाठी सर्व माहिती आॅनलाइन भरण्याची अट आहे. माहिती ठेवणे ती अपलोड करण्यात संघांकडून चालढकल होत आहे. परिणामी अनुदानाचे पैसे शासनाकडून मिळवणे आणि खाली ते संकलन केंद्रापर्यंत पोचविण्याचे काम सहकारी संघ, खासगी संघ वेळेत करू शकत नाहीत. कुठे अनुदानाची वाट पाहत बसायची, एक-दोन रुपये कमी तर कमी म्हणून शेतकरीही गप्पगुमान हा दर घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com