दुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘अच्छे दिन’ : क्रिसिल

दुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘अच्छे दिन’ : क्रिसिल
दुधावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना ‘अच्छे दिन’ : क्रिसिल

देशात दुधाचा पुरवठा वाढला असून केवळ दूध विकणाऱ्या कंपन्या मागे पडतील; परंतु मूल्यवर्धित उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता ही उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या मात्र चांगली कामगिरी करतील, असे रेटिंग एजन्सी ‘क्रिसिल’च्या अहवालात म्हटले आहे.  मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांना डोळ्यांसमोर ठेवून देशातील डेअरी क्षेत्रात पुढील तीन वर्षांत १३० ते १४० अब्ज रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज ‘क्रिसिल’ने व्यक्त केला आहे. दुधाची खरेदी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी संघटित क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांच्या काळातही साधारण एवढीच गुंतवणूक केलेली होती. पुढील तीन वर्षेही हाच कल कायम राहील, असे ‘क्रिसिल’चे म्हणणे आहे.    देशातील डेअरी उद्योगाची पुढील तीन वर्षांत वार्षिक १४-१५ टक्के वाढ होईल, असे या अहवालात नमूद केले आहे. कंपन्यांच्या संभाव्य गुंतवणुकीमुळे दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता २५ ते ३० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. तसेच दूध खरेदीची व्यवस्था अधिक भक्कम होण्याचा अंदाज आहे. सार्वजनिक आणि खासगी इक्विटी, तसेच केंद्र सरकारच्या डेअरी प्रक्रिया व पायाभूत सुविधा विकास निधीतून कर्ज या माध्यमातून या गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध होईल, असे मानले जात आहे. ‘क्रिसिल’ने या अहवालासाठी १०० कंपन्यांचा अभ्यास केला. संघटित डेअरी क्षेत्रातील महसुलात या कंपन्यांचा वाटा ६० टक्क्यांच्या आसपास आहे. दूध विक्रीतील सातत्यपूर्ण वाढ पाहता डेअरी क्षेत्र २०२०-२१ पर्यंत ७५०० अब्ज रुपयांचा महसूल प्राप्त करेल, असा अंदाज आहे. २०१७-१८ मध्ये महसूल ५७०० अब्ज रुपये होता.  अमूल ब्रँडने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) २०२२ पर्यंत ५० अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यतः दूध प्रक्रियेची क्षमता वाढविणे आणि वितरण यासाठी ही गुंतवणूक असेल. देशांतर्गत बाजारपेठेत आणि परदेशातील भारतीयांकडून मागणी वाढल्यामुळे २०१८ या आर्थिक वर्षात ‘अमूल’ची उलाढाल २९५ अब्ज रुपयांपर्यंत जाऊन पोचली. हेरिटेज फुड्स या बलाढ्य कंपनीने रिलायंस डेअरी अधिग्रहित केल्यानंतर आता उत्तर भारतात मोठा विस्तार करण्याची आखणी केली आहे. ‘हेरिटेज फूड्स’ने तेलंगणातील शाह मोतीलाल फूड्स आणि पंजाबमधील वमन मिल्क फूड्स या कंपन्याही विकत घेतल्या आहेत. पराग मिल्क फूड्स या कंपनीने मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे २०१७ ते २०२० या कालावधीत कंपनीच्या नफ्यात ४९ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.     देशातील दूध उत्पादनात १९९४-९५ ते २०१७-१८ या कालावधीत वार्षिक ४.४ टक्के वाढ झाली आहे. याच कालावधीत अन्नधान्य उत्पादनातील वाढीचा दर १.५ टक्के राहिला. वाढते शहरीकरण आणि लोकांच्या आहारविषयक सवयींमध्ये झालेला बदल यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com