परभणीत किमान दूधदरावरच उत्पादकांना मानावे लागते समाधान
परभणीत किमान दूधदरावरच उत्पादकांना मानावे लागते समाधान

परभणीत किमान दूधदरावरच उत्पादकांना मानावे लागते समाधान

परभणी ः शासकीय दुग्ध योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील दूध उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर किमान २७ रुपये, तर म्हशीच्या दुधात प्रतिलिटर ३६ रुपये दर दिले जातात. शीतकरण केंद्रावर आलेल्या दुधाच्या परीक्षण चाचण्या व्यवस्थित घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांना फॅट, एसएनएफच्या प्रमाणात जादा दर मिळत नाहीत. किमान दरावरच समाधान मानावे लागते. मापात खोट आणून वाढीव दुधाची मलई खाण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सध्या परभणी येथील शासकीय दुग्ध शाळेत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतून दररोज ३३ हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. परभणी येथे साठविण्याची व्यवस्था नसल्यामुळे हिंगोली, नांदेडचे दूध उदगीर येथे पाठविले जात आहे. अतिरिक्त दूध नाकारले जात आहे. त्यामुळे दूध उत्पादक संस्थासह शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. फॅट-एसएनएफचे प्रमाण ३.५-८.५ असलेल्या गायीच्या दुधास प्रतिलिटर २७ रुपये, ६.०-९० प्रमाण असलेल्या म्हशीच्या दुधास ३६ रुपये दर जात आहेत. त्यापेक्षा अधिक फॅट -एसएनएफ असल्यास पाॅइंटनुसार कमाल दर मिळू शकतात; परंतु शीतकरण केंद्रावर दुधाचे परीक्षण करताना पाॅइंट कमी करून किमान दरापर्यंत आणण्याचे गैरप्रकार घडत आहेत. फॅट, एसएनएफच्या प्रमाणानुसार योग्य दर मिळण्यासाठी शीतकरण केंद्रावर अद्ययावत दूध परीक्षण यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. दुधाची नासाडी थांबविण्यासाठी बल्क कुलरची क्षमता वाढवावी, अशी मागणी शेतकरी, दूध उत्पादक संस्थांकडून केली जात आहे.

पहाटे लवकर दूध काढले जाते, परंतु शीतकरण केंद्र सकाळी उशिरा उघडले जातात. त्यामुळे अल्कोलच्या टेस्ट पाॅझिटिव्ह येतात. दूध परीक्षणासाठी अद्ययावत सामग्री उपलब्ध करून देत व्यवस्थित मोजमाप घेतले तर शेतकऱ्यांच्या दुधास जादा दर मिळू शकेल, असे बाभळगाव (ता. पाथरी) येथील दूध उत्पादक संस्थेचे विठ्ठल गिराम यांनी सांगितले.

शेतीपिकांचे शाश्वत उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी दुग्ध व्यवसायकडे वळले आहेत; परंतु शासकीय दुग्धशाळेकडून अतिरिक्त दूध नाकारले जात आहे. त्यामुळे नुकसान होत आहे, असे जवळा बाजार (जि. हिंगोली) येथील दूध उत्पादक भगवान सावंत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com