दूध उत्पादकांचे मोडले कंबरडे

गेल्या दोन महिन्यांत माझ्या नऊ गायींच्या उत्पादनापासून फायदा होण्याऐवजी सुमारे ३८ हजार रुपयांपर्यंतचा तोटा या व्यवसायातून झाला आहे. दर कमी करताना इतर गोष्टींचेही दर कमी होणे अपेक्षित आहे; पण पशुखाद्यांच्या किमतीत वाढ आणि दूध दरात कमी असे विपरीत चित्र राहिल्याने आम्ही अनुभवी दुग्धव्यावसायिकसुद्धा कोलमोडलो आहोत. -जोतिराम घोडके , दूध उत्पादक, वडणगे
दूध उत्पादकांचे मोडले कंबरडे -भाग १
दूध उत्पादकांचे मोडले कंबरडे -भाग १

कोल्हापूर : वाढता उत्पादनखर्च व दुधाच्या खरेदी दरकपातीने दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. पशुखाद्यासह अन्य खर्चात नियमित वाढ होत असली, तरी त्या तुलनेत दुधाचा खरेदी दर वाढण्याऐवजी त्यात कपातच होत आहे. यामुळे शेतीपूरक असणाऱ्या दुग्धव्यवसायाचे गणित बिघडले आहे. अगोदरच दुग्धव्यवसाय संकटात असताना गायीच्या दूधदरात लिटरमागे दोन रुपयांची कपात झाल्याने त्याचा जबदरस्त फटका उत्पादकांना बसत आहे.

पशुखाद्यासह अन्य खर्चात वाढ दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने दोन महिने हे उत्पादकांची अक्षरश: परीक्षा पाहाणारे गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत पशुखाद्याचे दर एका पोत्यामागे तब्बल १०० रुपयांनी वाढले; तर खासगी पशवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी शुल्कात दीडपट ते दोनपट वाढ केली आहे. सलाइनच्या किमतीही एका बॉटलमागे १०० रुपयांच्या आसपास वाढल्या. या तुलनेत दूधखरेदी दरवाढ तर झाली नाहीच; परंतु उलट दर कमी झाल्याने तोट्याच्या दुष्टचक्रात उत्पादक अडकत चालल्याचे दृश्‍य आहे. दोन महिन्यांतील उलाढालीचा विचार केल्यास सरासरी १५ लिटर दूध देणाऱ्या एका गायीमागे दररोज ३० रुपयांचा उत्पादनखर्च वाढला, तर १५ लिटरला प्रतिलिटर रुपये २ रुपये याप्रमाणे दरात कपात गृहीत धरल्यास तब्बल ७० ते ८० रुपये तोटा झाला. पशुखाद्य व उत्पादनखर्चाची वाढ धरल्यास एका गायीमागचा तोटा १०० रुपयांहून अधिक रुपये होत असल्याचे चित्र आहे. यातून कसे बाहेर यायचे, याच चिंतेत दुग्धउत्पादक आहेत.

हिशेबात नफा शून्यच दूधदर कपातीच्या खेळात दूध उत्पादकाचा जीव जात आहे. दररोज चोवीस तास या व्यवसायात देऊनही न सोसणारा तोटा होत नसल्याने उत्पादकांत खळबळ उडाली आहे. दूध संघाचे तोटे आकडेवारीने सामोरे येत असले, तरी प्रत्यक्षात उत्पादकांच्या तोट्याबाबत कुठेच वाच्यता होत नसल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे (ता. करवीर) येथील जोतिराम घोडके हे सुमारे पस्तीस वर्षांपासून दुग्धव्यवसायात आहेत. त्यांच्याकडे नऊ गायी आहेत. दररोज सरासरी सत्तर लिटर दुधाचा पुरवठा श्री. घोडके दूध संघास करतात; परंतु दूध संघाने दोन रुपये दर कमी केल्या केल्या पहिला दणका घोडके यांना बसला. दुधाच्या तुलनेत पशुखाद्य व अन्य खाद्याचे वाढलेले दर; तसेच ठेवून खरेदी दरात कपात केल्याने प्रत्यक्ष नुकसानास प्रारंभ झाला. घरची सगळी ताकद या व्यवसायात लावूनही आता हा व्यवसाय टिकणे अशक्‍य असल्याचे घोडके सांगतात. तोट्याच्या बनत चाललेल्या या व्यवसायाकडे कोणीच गांभीर्याने पाहात नसल्याची हतबलता श्री. घोडके यांनी व्यक्त केली. घोडके यांनी सांगितलेला त्यांच्या गोठ्यातील गायीपासून मिळणारे उत्पन्न असे : एक गायीचा व्यवस्थापन खर्च (दररोज पंधरा लिटर देणारी गाय) (प्रतिदिन) सर्व प्रकारचे पशुखाद्य-२५० चारा-५० मनुष्यबळ-१०० लाईट बिल-15 बॅंक व्याज-३० एकूण खर्च-४४५ रुपये

जुन्या दराप्रमाणे म्हणजे अंदाज २७ रुपये प्रतिलिटर होणारी रक्कम ः ४०५ रुपये (या दराप्रमाणे होणारा दररोजचा तोटा- ४० रुपये प्रतिदिन, प्रतिगाय)

कमी केलेल्या दराप्रमाणे म्हणजे २५ रुपये लिटरप्रमाणे होणारी रक्कम ः ३७५ (याप्रमाणे होणारा दररोजचा तोटा ः ७० रुपये प्रतिदिन प्रतिगाय) (गेल्या दोन महिन्यांत पशुखाद्यासह अन्य किमतीत वाढ झाल्याने १०० रुपयांपर्यंत नुकसान होत आहे)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com