दूध खरेदी दरात चार रुपये कपात
दूध खरेदी दरात चार रुपये कपात

दूध खरेदी दरात चार रुपये कपात

सोलापूर : राज्य शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २७ रुपयांचा खरेदी दर याआधीच जाहीर केला आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत सहकारी दूध संघांकडून चालढकल सुरू असताना, आता खासगी दूध संघांनी मात्र थेट प्रतिलिटर २३ रुपयांपर्यंतचा दूध खरेदी दर स्वतःच ठरवून घेतला आहे. त्याची अंमलबजावणी घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू केली आहे.

विशेष म्हणजे खासगी दूध संघांच्या या निर्णयावर शासनाकडून अद्याप कोणताच हस्तक्षेप झालेला नाही. शिवाय, खासगी संघांनंतर आता सहकारी संघही याच मनःस्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे आहेत.

खासगी संघाच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सर्वाधिक सुमारे ३५ ते ४० लाख लिटर दूधसंकलन खासगी संघाकडे आहे. त्यापाठोपाठ १२ ते १५ लाख लिटर दूध सहकारी संघ खरेदी करते. चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनावेळी दूध दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता.

त्या वेळी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गाईच्या ३.५ ते ८.५ फॅटच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ३८ रुपये दर जाहीर केला होता; पण त्यानंतर काही मोजक्‍या संस्था आणि संघ वगळता, अन्य संस्थांनी हा वाढीव दर देण्याबाबत चालढकल केली. दुधाची वाढलेली आवक आणि कमी मागणी, त्यात दूध पावडरचे उत्पादन आणि विक्रीतील अडचणीचे अनेक मुद्दे पुढे करण्यात आले.

गेल्या आठवड्यात अकलूजमध्ये राज्यातील सहकारी दूध संघांच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यात सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी दूध संघ आणि शेतकऱ्यांना सरकारकडून थेट अनुदान देण्याची मागणी केली. त्यानंतर आता खासगी दूध संघांनी अशा पद्धतीची बैठक घेऊन दुधाचा स्वतःचा दरच ठरवून टाकला आहे.

त्यानुसार आता २३ रुपये दरानुसार गाईच्या दुधाची खरेदी खासगी संघांकडून होणार आहे. अर्थात, खासगी दूध संघांवर शासनाची कोणतीच बंधने नाहीत. त्यामुळे त्यांना मोकळीक आहे; पण सहकारी संघांवर मात्र बंधने आहेत; पण खासगी संघाच्या या निर्णयानंतर सहकारी संघही त्याच मनःस्थितीत आहेत.

खासगी संघांना बंधन नाही सध्या आमचा दर हा २७ रुपयेच आहे; पण दुधाची आवक आणि बाजारातील परिस्थिती याचा विचार करता, आम्हालाही काही निर्णय घ्यावा लागेल. दूध संस्थांना थेट अनुदान देण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे; पण अद्याप निर्णय झालेला नाही. खासगी संघांना बंधन नसल्याने ते निर्णय घेऊ शकतात, असे सोलापूर जिल्हा दूध संघांचे व्यवस्थापक संचालक सतीश मुळे यांनी सांगितले.

जीएसटीमुळेही अडचणीत बाजारात दुधाला उठावच नाही, काय करणार? दुधाच्या प्रक्रियायुुक्त पदार्थांनाही मागणी कमी आहे. त्यात जीएसटीमुळेही आम्ही अडचणीत आलो आहोत. यापुढेही अशीच स्थिती राहिली, तर आणखी एखादा रुपया कमीही होऊ शकतो, असे दशरथ माने (सोनाई दूध संघ, इंदापूर, जि. पुणे) यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com