खरेदी बंद आंदोलन दूध संघांकडून मागे

खरेदी बंद आंदोलन दूध संघांकडून मागे

पुणे : राज्यातील सहकारी दूध संघांवर बरखास्तीची सुरू केलेली कारवाई तूर्त केली जाणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. यामुळे दूध संघांचे एक डिसेंबरपासून होणारे बेमुदत दूध खरेदी बंद आंदोलनदेखील मागे घेण्यात आले आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी २७ रुपये, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३६ रुपये दर द्यावा, असे आदेश दुग्धविकास खात्याने काढले होते. या नव्या दराप्रमाणे दुधाची खरेदी न करणाऱ्या संघांना शासनाने बरखास्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या.

दुधाचे जादा उत्पादन आणि पावडरचे कोसळलेले बाजारभाव यामुळे दुध संघांना सुधारित दर देता येत नाही. त्यामुळे बरखास्तीची कारवाई अयोग्य असून, पुढील कारवाई स्थगित न केल्यास एक डिसेंबरपासून राज्यस्तरीय दूध खरेदी बंद आंदोलन अटळ राहील, असा इशारा खासगी व सहकारी दूध संघांनी दिला होता.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी सांगितले, की सुधारित दर देत नसल्याच्या कारणावरून राज्य शासनाने दूध संघांना सहकार कायद्याच्या कलम ७९अ प्रमाणे नोटिसा दिल्या. यात कात्रज, वारणा, गोकुळ, राजहंससहित १५ संघांचा समावेश आहे. याबाबत औरंगाबादला मंगळवारी झालेल्या बैठकीत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्यात आली.

' ७९अ प्रमाणे नोटिसा बजावल्या असल्या तरी पुढील कारवाई केली जाणार नाही. तसेच राज्यातील दुग्ध व्यवसायाबाबत असलेल्या समस्यांबाबत त्रिसदस्यीय समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर उपाय केले जातील, असे आश्वासन मंत्री जानकर यांनी दिले. यामुळे आम्ही एक डिसेंबरपासून सुरू होणारे आंदोलन स्थगित केले आहे, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दूध संघ व राज्य शासनामध्ये तयार झालेला तिढा सोडविण्यासाठी औरंगाबादमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला. मंत्री जानकर यांनीदेखील या वेळी झालेल्या चर्चेत दुग्धविकास मंत्रालयाच्या वतीने लवचिक भूमिका घेण्याची तयारी दाखविली.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्यासह रणजित मोहिते पाटील, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, पुणे दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी या वेळी चर्चेत भाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com