दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागे

दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागे
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागे

नागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर २५ रुपये करण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी विधानसभेत, तर दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत जाहीर केला. खासगी व सहकारी दुधप्रक्रिया संस्थांनी या निर्णयाला मान्यता दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत करत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचे गावोगावी फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.

जादा दुधाचे रुपांतरण करण्यासाठी प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षांचे नेते यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी खासगी व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी ही घोषणा केली.

जानकर म्हणाले, ‘‘दुध भुकटी व दूध निर्यातीसाठी अनुक्रमे 50 रुपये व पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय 10 जुलैला घेतला. तो कायम राहील. त्या व्यतिरिक्त आजच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संघांनी उत्पादीत केलेल्या पिशवी बंद दुधासाठी कोणतेही अनुदान दिले जाणार नाही. पिशवीबंद दूध वगळून उर्वरीत दुधासाठी राज्य शासन प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे रुपांतरण अनुदान देईल. हे अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेला दिले जाईल. दुध भुकटी संस्थांना अनुदान दिल्यास, त्यांना निर्यातीसाठी अनुदान मिळणार नाही. ज्या संस्था 21 जुलैपासून दुध उत्पादक शेतकऱयांना 25 रुपये भाव देतील, तेच अनुदानासाठी पात्र राहतील. या निर्णयास दुधप्रक्रिया व दुध पुरवठा करणाऱया संस्थांनी एकमताने सहमती दर्शविली आहे.‘‘

कात्रज डेअरीचे अध्यक्ष विष्णू हिंगे, गोपाळ म्हस्के, व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर बैठकीला उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, ‘‘सरकारने सर्व संस्थांना एकाच व्यासपीठावर आणल्यामुळे या निर्णयाचा निश्‍चित फायदा होईल. शेतकऱयांना प्रति लीटर 25 रुपये मिळाल्यास त्यांची तक्रार राहणार नाही.‘‘

डेअरी विभागाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या एक लाख दहा हजार लीटर दूध संकलित होते. त्यापैकी 70 लाख लीटर दूधाची पिशवीतून विक्री होते. राहिलेल्या 40 लाख लीटर दुधाचे अन्य प्रक्रियेत रुपांतर केल्यास त्यांना अनुदान दिले जाईल. जानकर म्हणाले, की सर्वसाधारणपणे महिन्याला 75 कोटी रुपये म्हणजे पुढील दोन महिन्यासाठी दीडशे कोटी रुपये अनुदान द्यावे लागेल.

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, विधान परीषद सभापती रामराजे निंबाळकर, मंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, सुभाष देशमुख, महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जून जानकर, सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, सुरेश धस, राहूल मोटे, राहूल कूल, सतेज पाटील, रामहरी रुपनवर बैठकीला उपस्थित होते.

असा आहे निर्णय... - दुध भुकटी प्रति एक किलो निर्यातीसाठी 50 रुपये अनुदान - दुध उत्पादक शेतकऱयांना प्रति लिटर 25 रुपये दिल्यासच अनुदान मिळणार - पिशवी बंद दुधासाठी कोणते ही अनुदान नाही. - पिशवी बंद दूध वगळून दुधाला प्रति लिटर 5 रूपये अनुदान. मात्र अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल. - जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रति लिटर लाभ घेतील त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही - 21 तारखेपासून शेतकऱ्यांना प्रति लिटर  25 रुपये दर देणार.. - 21 तारखेपासून सहकारी आणि खाजगी दूध संस्थांना 25 रुपये प्रति लिटर दर दिल्यास लाभ मिळेल दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी नागपूरला जाऊन निर्णयाचे स्वागत करत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com