सांगली जिल्ह्यातील जनावरांना मिळणार टॅग

जनावरांना युनिक आयडी
जनावरांना युनिक आयडी

सांगली  ः दुधाळ जनावरांना आधार कार्डप्रमाणे ‘युनिक आयडी’ म्हणजे ‘विशिष्ट ओळख क्रमांक’ दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे दीड लाख दुधाळ जनावरांना १२ अंकी क्रमांक असलेला बिल्ला देण्यात येणार आहे. सर्वच जनावरांना हा क्रमांक देणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी दिली.

केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेअंतर्गत जनावरांची ओळख आणि त्यांच्या प्रजननाबाबत माहिती ऑनलाइन संकलित केली जाणार आहे. त्यासाठी १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांकाचे बिल्ले, ‘इनाफ’ संगणक प्रणाली, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्याकडून उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत विविध योजनेतून, दूध संघाकडून खरेदी केलेल्या जनावरांनाच विमा कंपन्याकडून बिल्ले कानात बसवले जात होते; मात्र आता सर्वच दुधाळ जनावरांना १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे. हा क्रमांकाचा बिल्ला जनावरांच्या कानात बसविण्यात येणार आहे. यामुळे जनावरांचे दूध संकलन किती होते, जात कोणती, मालकाचे नाव आदी माहिती गोळा करून ती संगणक प्रणालीवर नोंद होणार आहे. त्यामुळे जनावरांची वंशावळ, दुग्धोत्पादन याबाबत माहिती पशुसंवर्धन विभागास एका क्‍लिकवर मिळेल.

पशुसंवर्धन विभागाच्या सेवा भविष्यात मिळण्यासाठी विशिष्ट ओळख क्रमांकाचा बिल्ला असणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पशुपालकांनादेखील त्यांच्या जनावरांची माहिती सहज उपलब्ध होईल. जनावर विकले किंवा नवीन खरेदी केले, तर मागील प्रजननाच्या नोंदी, जनावरांची वंशावळ आदी माहिती मिळेल. दुधाळ जनावरांच्या मालकाकडे पशुवैद्यकीय अधिकारी आल्यास जनावरांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. सर्व दुधाळ जनावरांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या सेवा मिळण्यासाठी ओळख क्रमांकाचा बिल्ला असणे आवश्‍यक आहे. नोंदणीमुळे पशुपालकांना सहज संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. जास्तीत जास्त पशुपालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com