देशात सरासरीच्या तुलनेत पाच टक्के कमी पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
पुणे ः हवामान विभागाने यंदा देशात ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु एकंदरीत झालेला पावसाचा प्रवास व खंड बघता दरवर्षीप्रमाणे पावसाने यंदाही देशातील वायव्य आणि मध्य भारतात हुलकावणी दिली. त्यामुळे गेल्या चार महिन्यात देशात सरासरीच्या ८७५.२ मिलिमीटरपैकी आत्तापर्यत प्रत्यक्षात ८२७.४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत देशात झालेला पाऊस पाच टक्के कमी अाहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली अाहे.   
 
यंदा जून महिन्यात माॅन्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने दक्षिण द्वीपकल्पाच्या अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नद्या दुथडी भरून वाहिल्या. त्यानंतर पावसाने काहीशी दडी मारली; परंतु गेल्या दीड महिन्यात दक्षिण द्वीपकल्पाच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. 
 
गेल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्याचे चित्र आहे. दक्षिण द्वीपकल्पच्या परिसरात सरासरी ६९७.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात ६८७.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास हा पाऊस एक टक्के कमी आहे. 
 
हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरी १४१५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात येथे १३५४.४ मिलिमीटर पाऊस पडला. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत चार टक्के कमी अाहे. 
 
वायव्य भारतात सरासरी ६१०.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ५५२.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस नऊ टक्के कमी आहे. दरवर्षी मध्य भारतात सरासरी ९६४.९ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ३० सप्टेंबरपर्यत ९१०.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस सहा टक्के कमी अाहे. 
दक्षिण भागात कमी पाऊस
देशात २१ ते २७ सप्टेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत देशात सरासरी ३६.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात ३२.५ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत १० टक्के कमी पाऊस पडला. दक्षिण भागात सरासरी ४१.५ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात ३२.३ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत २२ टक्के कमी पाऊस पडला.
भारताच्या ईशान्य भागात सरासरी ६३.८ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ३८.२ मिलिमीटर एवढा पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ४० टक्के कमी पाऊस पडला आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com